Wednesday 6 July 2016

केल्याने होत आहे...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी गावात किकवी नदीवर लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यामुळे परिसराचे चित्र पालटणार आहे.
त्र्यंबकेश्वरपासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाततली नळपाणी योजना स्रोताअभावी गेल्या तीन वर्षापासून बंद पडली होती. हिवाळ्यानंतर गावातील विहिरीचे पाणी अटत असल्याने उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरविले जात असे. गुरांना पाण्यासाठी भटकावे लागे. महिलांनादेखील 2 ते 3 किलामीटरची पायपीट पाण्यासाठी करावी लागत असे. गौतमी-गोदावरी धरणाजवळ असूनही शेतकऱ्यांची भिस्त खरीपावरच होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी सामाजिक कार्याकर्ते बहिरू मुलाणे  आणि इतर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन बंधारा बांधण्याचे निश्चित केले.

गावात बैठक घेऊन लोकसहभागाचे आवाहन करण्यात आले. सुरूवातीला काही ग्रामस्थांनी कामाच्या यशाविषयी शंका उपस्थित केली. मात्र काम सुरू झाल्यावर ग्रामस्थांचे चांगले सहकार्य  लाभले. 15 मे ते 30 जून अशा दीड महिन्याच्या कालावधीत किकवी नदीतील गाळ उपसण्याबरोबर 50 मीटर लांब आणि 4 मीटर खोल आकाराचा सिमेंट बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याच्या निर्मितीवर आलेला खर्च परिसरातील शेतकऱ्यांनीच केला. स्वत: मुलाणे यांनी जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिले.

आज या बंधाऱ्यामुळे दोन किलोमीटरपर्यंत नदीचे पात्र भरलेले आहे. गौतमी-गोदावरी धरणाच्या सांडव्यातील पाणी बंधारात येत असल्याने उन्हाळ्यातदेखील पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे 200 एकर क्षेत्र बागायतीत रुपांतरीत होईल, असा विश्वास मुलाणे व्यक्त करतात. नदीच्या दोन्ही बाजूस असलेल्या बेझे, राजावाडी आणि पिंपरी अशा तीन गावातील शेतकऱ्यांना या बंधाऱ्यामुळे फायदा होणार आहे.

बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस विहीर करून गावास पाणी पुरवठा करण्याचा ग्रामस्थांचा मनोदय आहे. या बंधाऱ्यामुळे फायदा झाल्याने असे आणखी दोन बंधारे संपुर्णपणे लोकसहभागातून बांधण्याचे नियोजनही सुरू करण्यात आले आहे.  पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यावर गावातील शौचालयाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशाही ग्रामस्थांना आहे.
दत्तू भालके, शेतकरी पिंपरी- बंधाऱ्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. गेल्यावर्षी पाणी नसल्याने गहू वाळला. आता बंधाऱ्यामुळे बारामहिने पिके घेता येतील. उन्हाळ्यात भाजीपालादेखील पिकविता येईल.
बहिरू मुलाणे-जनतेने पुढाकार घेतल्यास कोणतीच समस्या गावात रहात नाही. विशेषत: तरुण पुढे आल्यास परिवर्तन सहज शक्य होते.


No comments:

Post a Comment