Tuesday 5 July 2016


              
                                         नाशिक जिल्हा-एक दृष्टिक्षेप
        सह्याद्रीच्या  कुशीत उगम पावणाऱ्या गोदावरी नदीच्या  तिरावर नाशिक हे शहर वसलेले आहे. नाशिक हे शहर पुराणकाळापासून पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या क्षेत्राचा प्राचीन काळात पद्मनगर, त्रिकंटक, जनस्थान असा उल्लेख आढळून येतो. पौराणिक काळात राम-लक्ष्मण यांच्या चौदा वर्षाच्या वनवास काळात नाशिक सभोवतालच्या जंगलात (दंडकारण्य) लक्ष्मणाने शूर्पणखा नावाच्या राक्षसिणीचे नाक कापले होते. संस्कृत भाषेत नाकाला नासिका म्हणतात, म्हणून या भागाचे/ जिल्ह्याचे नाव ‘नाशिक’ असे पडले आहे असे मानण्यात येते.
 नाशिक जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तर भागात 18.33 ते 20.53 उत्तर अक्षांश आणि 73.16 ते 75.16 पूर्व रेखांश या पट्टयात वसलेला आहे. जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची 565 मी. आहे. जिल्ह्याचे क्षेत्र साधारणत: तीन प्रमुख खोऱ्यांमध्ये विभागले गेले आहे.
 1) गोदावरीचे खोरे- जिल्ह्याचा पूर्व व दक्षिण भाग
2) तापीचे खोरे -जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग
3) दमणगंगेचे खोरे-(पश्चिम वाहिनी नद्या)
 जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरगाणा आणि पेठ हे तालुके येतात. हे तालुके इतर भूभागाच्या  तुलनेत समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर वसलेले  आहेत. या तालुक्यांतील सर्व नद्या सहयाद्री पर्वतात उगम पावून पूर्वेकडे पश्चिमेकडे वाहतात. वरील दोन तालुके वगळता उर्वरित जिल्ह्याच्या मध्यातून पूर्व-पश्चिम अशी रेषा गृहीत धरल्यास जिल्ह्याचे दोन भाग होतात. या रेषेच्या उत्तरेकडील भागातील पावसाचे पाणी गिरणा व तिच्या उपनद्यांव्दारे सरतेशेवटी तापी नदीत वाहून जाते. तर रेषेच्या दक्षिणेकडील भूभाग गोदावरीच्या खोऱ्यात वसलेला आहे. जिल्ह्यातील नद्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील सर्व नद्या जिल्ह्यातच उगम पावतात. एकही जलप्रवाह जिल्ह्याबाहेरुन येत नाही. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर सह्याद्री पर्वतमाला आहे. तसेच जिल्ह्यात अनेक डोंगर आहेत. जिल्ह्यातील बहुतेक सर्व  डोंगर पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतांचे पूर्वेकडे पसरलेले फाटे आहेत.
          महाराष्ट्रातील सर्व विविधता नाशिक जिल्ह्यात दिसून येते. सुरगाणा आणि पेठ या तालुक्यातील पावसाचे प्रमाण, हवामान, पिके हे कोकणातील सर्व बाबींशी समरुप आहेत. या तालुक्यांतील वनात उत्कृष्ठ प्रतीचा  साग व इतर गौण वन उत्पादने  मोठ्या प्रमाणात मिळतात. याच डोंगराळ भागात बहुतांश आदिवासी लोकवस्ती आहे. जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात पश्चिम महाराष्ट्रासारखी भाजीपाला, फळे  आणि मोठ्या प्रमाणात  ऊस पिकतो. या भागात साखर कारखाने आहेत. या भागात ओलीताखालील क्षेत्र जास्त असल्यामुळे दुधाकरिता आवश्यक असलेल्या हिरव्या चाऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे दुधाचे उत्पादन भरपूर होते. जिल्ह्यात उत्पादित होणारा भाजीपाला मोठ्या प्रमाणात मुबंईला पुरविला जातो, त्याच्याखालोखाल गुजरात राज्यात पाठविण्यात येतो. म्हणून नाशिक जिल्ह्यास ‘मुबंईची परसबाग’ व ‘गवळीवाडा’ असेही म्हणतात.
 पुणे, मुबंई प्रमाणेच नाशिक जिल्ह्याचे झपाट्याने औद्योगीकरण होत आहे. जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व भागात हवामान उष्ण असल्यामुळे येथे विदर्भ-मराठवाडयाप्रमाणे कापूस व ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. परंतू नाशिक जिल्ह्याची ओळख आता प्रामुख्याने द्राक्षे, कांदा, डाळिंब व भाज्या या पिकांकरिता झालेली आहे. पिंपळगांव (बसवंत) ही द्राक्षाची तर लासलगांव ही कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. या दोन पिकांमुळे नाशिकला आंतरराष्ट्रीय ओळख लाभलेली आहे. विशेषत: निर्यातक्षम द्राक्षे व वायनरी उद्योगासाठी जिल्हा प्रसिद्ध आहे.
          नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ 15.548 चौरस कि.मी आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी 5.04 टक्के  क्षेत्र व्यापलेल्या या जिल्ह्याचा, राज्याच्या एकूण क्षेत्रफळाचा विचार करता, तिसरा क्रमांक आहे. 2011  च्या जनगणनेनुसार राज्याच्या 5.44 टक्के म्हणजेच, 61.07 लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्याचा लोकसंख्येबाबत राज्यात चौथा क्रमांक आहे. राज्याचा दर चौरस कि.मी. मध्ये 365 लोकसंख्या घनतेच्या तुलनेत जिल्ह्याची दर चौरस  कि.मी. लोकसंख्या घनता 393 इतकी आहे. जिल्ह्यात एकूण 1,922 खेडी, 15 तालुके, दोन महानगरपालिका, एक कटकमंडळ, आठ नगरपरिषदा आणि जनगणना शहरे या नागरी क्षेत्रात एकूण  25.97 लाख लोकसंख्या आहे. नागरी लोकसंख्या  एकूण लोकसंख्येच्या 42.52 टक्के इतकी आहे. जिल्हयातील 2011 च्या एकूण लोकसंख्येपैकी 57.48 टक्के व्यक्ती ग्रामीण भागात राहतात. 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येशी साक्षरतेचे प्रमाण 82.31 टक्के आहे. राज्यात सन 2001-2011 या दशकात नाशिक शहराच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर सर्वाधिक म्हणजे 37.95 टक्के इतका होता.
          नाशिक जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारण विषम स्वरुपाचे असून वार्षिक सरासरी पर्जन्यमान 787.73 मि.मि.  आहे. जिल्ह्यातील जमीन  काळी, माळ, कोरड व बरड या चार प्रकारात विभागलेली आहे. पृष्ठभागापासून भूगर्भातील पाण्याची पातळी 5 ते 55 फुटांपर्यंत आहे.
         
          जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते असे एकूण 15,203.49 कि.मी. लांबीचे रस्ते अस्तित्वात आहेत. जिल्हयातून मुंबई-आग्रा ( राष्ट्रीय महामार्ग  क्र.3) व पुणे-नाशिक (राष्ट्रीय महामार्ग क्र. 50) हे दोन राष्ट्रीय महामार्ग जात असून, या दोन मार्गामुळे नाशिक शहर राज्यातील अन्य शहरांशी तसेच शेजारच्या राज्यातील प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे. जिल्ह्यात असलेल्या राज्य महामार्गामुळे जिल्ह्यातील महत्वाची शहरे व तालुक्यांची ठिकाणे  जोडली गेली आहेत.
          जिल्ह्यात 287 कि.मी. लोहमार्गाचे जाळे असून, जिल्ह्यातील इगतपुरी , नाशिक, निफाड, नांदगांव व येवला या तालुक्यातून लोहमार्ग गेलेला आहे. या लोहमार्गावर जिल्ह्यातील मनमाड  रेल्वेजंक्शन आहे. तेथून पुणे जिल्ह्यातील दौंड व पुढे सोलापूरकडे रेल्वेचा मार्ग गेलेला आहे. तसेच मनमाडवरुनच मराठवाड्यातील औंरगाबाद, नांदेडकडे दुसरा एक मार्ग गेलेला आहे.
                    जिल्ह्यातील उद्योगक्षेत्रात महिंद्र आणि महिंद्र, मायको, गरवारे, क्रॉम्पटन व जिंदाल इत्यादी मोठमोठ्या उद्योग समुहांचा समावेश आहे. जिल्ह्याला औद्योगिक क्षेत्राची पार्श्वभूमी लाभलेली आहे. जिल्ह्यात कृषि उद्योगासह अन्य उद्योगदेखील मोठ्या प्रमाणात स्थापित आहेत. मुसळगांव, माळेगांव (ता. सिन्नर) गोंदे (ता.इगतपुरी) सातपुर, अंबड (ता.नाशिक) येथे मोठे औद्योगिक क्षेत्र विकसित झालेले आहे. शासकीय स्तरावर नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय, चलार्थ पत्र मुद्रणालय, ओझर येथील संरक्षण दलाचा लढाऊ विमानांचा प्रकल्प ही काही महत्वाची उदाहरणे देता येतील.
जिल्ह्यात पुढील काही महत्वाच्या संस्था कार्यरत  आहेत.
 1 तोफखाना केंद्र देवळाली.
2 एकलहरे औष्णिक वीजनिमिर्ती केंद्र
3. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था
4. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ.
5. महाराष्ट्र पोलीस अकादमी.
          राज्य शासन, स्थानिक संस्था, इतर सेवाभावी संस्था व खाजगी दवाखाने याद्वारे जिल्ह्यात आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. नाशिक येथे राज्य शासनाचे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुरु झालेले आहे. या रुग्णालयात विभागातील नागरिकांना विशिष्ट व अतिविशिष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात येतात.
          जिल्ह्यात उत्कृष्ट दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध असून, यामध्ये खाजगी स्वयंसेवी संस्थांचा मोठा सहभाग आहे. इतर शैक्षणिक सेवामध्ये महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन, औद्यागिक प्रशिक्षण संस्था आणि एक आयुर्वेदिक वैद्यकिय  महाविद्यालय आहे. तसेच कै. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त  विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ  येथे आहे.

No comments:

Post a Comment