Thursday 7 July 2016

 पंतप्रधान पीक विमा योजना
पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगामात लागू करण्यात आली आहे.  या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2016 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
योजनेंतर्गत भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सुर्यफूल, कारळा, कापूस आणि खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण प्राप्त होणार आहे. वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील भार कमी करण्यासाठी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी भरावायाचा विमा हप्ता केवळ दोन टक्के तर रब्बी हंगामासाठी दीड टक्का आहे. नगदी पिकासाठी विमा हप्ता पाच टक्के आहे. कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
योजने अंतर्गत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्‌रीवादळ, पूर, दुष्काळ, भूस्खलन, पावसातील खड, कीड व रोग आदी बाबींमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबींमध्ये समाविष्ट केलेली आहे. हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांचे काढणी पश्चात होणारे नुकसान, तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठीदेखील या पीक विम्याचे संरक्षण मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख अन्नधान्य, गळितधान्य आणि नगदी पिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी विमा संरक्षण करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना
पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत पिक विमा योजना राज्यात 2016 मधील मृग बहाराकरिता लागू करण्यासाठी शासनाने 5 जलै रोजी मान्यता दिली आहे. अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.
बिगर कर्जदार किंवा कर्जदार शेतकऱ्यांकरिता अधिसूचित फळपिकाचा विमाहप्ता भरण्याची अंतिम मुदत पेरू पिकासाठी 12 जुलै 2016 आणि डाळींबासाठी 14 जुलै 2016 आहे.  सर्व फळ उत्पादक शेतकरी बंधूंनी विहित मुदतीत विमाहप्ता भरून योजनेचा अधिकाधीक लाभ घेता येईल. अधिसूचित फळपिकांकरिता कर्ज मर्यादा मंजूर असलेल्या सर्व शेतकऱ्यांचा विमा विहित मुदतीत करून घेणे सर्व बँकाना अनिवार्य आहे.

0000000000

No comments:

Post a Comment