Tuesday 12 July 2016


जाणिवेतून समृद्धीकडे….
आपण ज्या परिसरात वाढतो, लहानाचे मोठे होतो, त्या परिसराबाबत आपलेपणा प्रत्येकालाच असतो. मात्र ही जाणीव जेव्हा कृतीत रुपांतरीत होते तेव्हा शिरसगाव सारखे काम उभे रहाते. चंद्रपूर  जिल्ह्यातील चिमूरचे तहसीलदार संतोष महाले यांच्या योगदानातून शिरसगावला चांगले काम उभे राहिले आहे.

एक हजार लोकसंख्येच्या या गावातील नदीवर जुन्या बंधाऱ्याला गेट नसल्याने वाल नदीचे पात्र पुर्णत: गाळाने भरले होते. पाणी बाजूने वाहत असल्याने नदीकिनारी असलेल्या आरोग्य केंद्राकडच्या बाजूची माती खचत होती आणि पावसाळ्यानंतर नदी कोरडी असायची. गावाचा जलयुक्त शिवारमध्ये समावेश झाल्यावर महाले यांनी नदीतील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांना त्र्यंबकेश्वरचे तहसीदार नरेश बहीरम यांनी सहकार्य केल्याने कामास सुरूवात झाली.


हरसूलमधील व्यावसायिक नितीन देवगावकर यांनी जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिली. स्थानिकांनी गाळ वाहण्यासाठी चार ट्रॅक्टर दिले. डिझेलचा खर्च जलयुक्त शिवार योनजेच्या माध्यमातून करण्यात आला. गावातील तरुण महाले यांच्यासह श्रमदानासाठी आले. नदी पात्रातून काढलेला गाळ आणि मुरूमाचा बाजूला भराव करून पाणी बंधाऱ्यातच अडविले जाईल याची व्यवस्था करण्यात आली.

पावसाळ्याला कमी कालावधी शिल्लक असल्याने तलाठी व्हि.एल.लोखंडे यांनी ग्रामस्थांना एकत्रित आणून काम लवकर पुर्ण करण्यासाठी सहाकार्य केले. साधारण 100 फूट लांब आणि सहा फूट खोल गाळ काढण्यात आला. जुन्या बंधाऱ्याची डागडुजी करून त्याला चार गेट बसविण्यात आले. हा संपुर्ण खर्च महाले यांनी केला.  गेटमुळे आता बंधाऱ्यात गाळ साचणार नाही.

नदीवरील इतरही दोन बंधाऱ्यातील स्थिती अशीच असल्याने उन्हाळ्यात कपडे धुण्यासाठी आणि गुरांसाठी पाण्याची समस्या येत असे. आता बंधाऱ्यामुळे साधारण 70 मीटर लांब नदीपात्रात पाणीसाठा होणार असल्याने 25 ते 30 हेक्टर शेतीलाही रब्बीसाठी फायदा होणार असल्याचे संदीप भरसळ यांनी सांगितले.
या कामातून प्रेरणा घेत ग्रामस्थांनी 9 दगडी बंधारे आणि 2 विहीरींसाठी विविध  योजनेतून प्रस्ताव सादर केला आहे. शिवकालिन तलावातील गाळदेखील काढण्याचा मनोदय गावातील तरुणांनी बोलून दाखविला. एका अधिकाऱ्याच्या संवेदनशिलतेमुळे आणि त्याला मिळालेल्या लोकसहभगाच्या जोडीमुळे झालेले परिवर्तन इतर गावांनाही मार्गदर्शक असेच आहे.


                                                                                                                                      
                                *******

No comments:

Post a Comment