Monday 11 July 2016





हिरवे स्वप्न
जिल्ह्यात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात बहुतेक ठिकाणी भाताचे पीक घेतले जाते. त्र्यंबकेश्वर तालुक्यात दौरा करताना ठिकठिकाणे दिसणारे रोपवाटिकेचे हिरवे गालिचे लक्ष आकर्षुन घेतात. डोंगरावरू कोसळणारे धबधबे, हिरवी वृक्षराजी आणि त्यात भातशेतीची चाललेली कामे पहाताना निसर्ग पर्यटनाचा आनंद मिळतो.


प्रवासात ग्रामीण जीवनाचे विविध पैलू जसे पहावयास मिळतात तसे भातशेतीचे प्रात्यक्षिक पहाण्याचा आनंदही काही निराळाच. कोकणातही अडीच वर्षे होतो. आपणही भात लावणीला (पुर्नलागवड) उतरावे आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यावा असे बऱ्याचदा वाटते.

देवगाव, हरसुल, शिरसगाव, ठाणपाडा, गोलीपाडा या सर्व भागात डोंगरावर, जागा असेल तिथे नांगरणी सुरू असल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या कालावधीत काही ठिकाणी ‘राप’ (रोपवाटीका) तयार आहेत. रोपवाटिकेतून रोपांची जुडी काढताना ‘इरलं’ घातलेल्या महिलांचे चित्र कॅमेऱ्यात कैद करताण्याचा अनुभवही निराळाच. शेतात तुंबलेल्या पाण्यावर हिरव्यागार रोपांची जुडी रांगोळीप्रमाणे दिसते.


नांगरणीसाठी काही ठिकाणी बैल तर काही ठिकाणी म्हैस किंवा रेड्याचा उपयोग केला जातो. ग्रामीण भागातही ट्रॅक्टर पोहोचल्याने चिखलणीचे आधुनिक तंत्रही पहायला मिळते. कुठे दुपारचा निवांतपणा, सहभोजनाचा आनंद, तर कुठे पालक काम करताना खोपट्यात मस्तीत दंग असणारी चिमुकली. शेतातून वाहणाऱ्या पावसाच्या चिखलयुक्त पाण्यातही त्यांना स्वर्गीय आनंद मिळतो. (शहरी मुले लगेच इन्फेक्शनचा विचार करतील.) दुपारच्यावेळी ढवळ्या-पवळ्याच्या जोडीलाही मालकाबरोबर निवांतपणा मिळतो.


निसर्गाच्या सहवासात हाच आनंद हाच अनुभव भरभरून मिळतो. डोंगराच्या वरच्या भागातून या शेतीचे सौंदर्य काही निराळेच दिसते. धरणीने पाहिलेले ‘हिरवे स्वप्न’ जणू  आभाळाच्या छायेत साकारताना दिसते. मधूनच पावसाची साथ. शेतकऱ्यांना त्याची तमा नसते. उलट एक प्रकारचा आनंद असतो. ‘आला रे बाबा एकदाचा’ म्हणत ते जोमाने कामाला लागतात. हे निसर्गचित्र टिपताना मन केव्हा निसर्गाशी एकरूप होते ते कळत नाही.


जिल्ह्यात भाताचे एकूण क्षेत्र-63 हजार 749 हेक्टर
त्र्यंबकेश्वर तालुक्यात-10477 हेक्टर




चारसुत्री भात शेती
·        भात पिकाच्या अवशेषातील पालाश व सिलिकॉन अन्नद्रव्यांचा फेरवापर
·        गिरीपुष्प झाडाच्या हिरव्या पाल्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर
·        अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारीत वाणांची नियंत्रीत लावणी
·        युरीया-डॉयअमोनिअयम फॉस्फेट या रासायनिक खतांचा ब्रिकेट स्वरुपात कार्यक्षम वापर
अधिक उत्पादन देणारे वाण- फुले राधा, इंद्रायणी, भोगावती, फुले समृद्धी




                                *******

No comments:

Post a Comment