Thursday 7 July 2016

एक अवलिया ‘ग्राम’सेवक
‘मला राजकारणाशी काही घेणे-देणे नाही, लोकांची जमेल तशी सेवा करायची’ देवगाव या आदिवासी गावातील गोटुराम दोंदे यांचे हे वाक्य. अगदी साधासरळ स्वभाव आणि हसरं व्यक्तिमत्व. गावाबद्दल असलेली आपलेपणाची भावना बोलण्यातून सतत प्रकटत होती.....
....गावाला भेटीचं निमित्त होते तसे जलयुक्त शिवारच्या कामाची माहिती घेण्याचे. संपर्क व्यक्ती म्हणून दोंदे यांचे नाव  त्र्यंबकेश्वर तहसीलदार नरेश बहिरम यांचेकडून मिळाले. गावात जाताक्षणी कळले की गावातील कोणतीही माहिती हवी असेल तर गोटुराम यांना पर्याय नाही. माहितीचा एकमात्र आणि तितकाच विश्वासू स्रोत.
ते व्यवसायाने शेतकरी. घरची 15 एकर जमीन. नागरी, भात, वरई, खुरसणी, रब्बी गहू, बाजरी, कारली, टमाटे आदी भाजीपाला शेतात पिकवितात. प्रयोगशील शेतकरी अशी त्यांची ओळख. केवळ स्वत:च प्रयोग करीत नाही तर गावकऱ्यांनीदेखील खरीपानंतर स्वस्थ न बसता शेतात कष्ट करावे असा त्यांचा आग्रह असतो.

दोंदे यांनी शासकीय योजनेतून ठिबक सिंचनाची सोय केली आहे. पाण्यासाठी 50 पाईप आणि इंजिन योजनेतूनच, अवजारे आणि पेरणी यंत्रदेखील त्यांनी अनुदानातून घेतले. 70 ते 80 हजाराचे अनुदान मिळाल्याचे ते सांगतात. मात्र शेतात स्वत: लहान भावासोबत कष्ट करतात.
मात्र त्यांची शेतकरी ही एकमात्र ओळख नाही. नव्हे ती मुळ ओळखच नाही. गावातला विश्वासू मित्र अशी त्यांची मुळ ओळख. त्याच्या सेवाकार्याची सुरूवात झाली ती एका गरजूला दाखला मिळवून देण्याने. वडील दहावीत असताना वारले. लहानपणापासून सेवेची आवड असल्याने शेताकडे वळताना गावाच्या विकासाचा विचार सुरू होताच. सुरूवातील तलाठ्याकडे काम करताना या सेवाभावनेला पोषक वातावरणही मिळाले.

 रात्री-पहाटे कुणालाही गरज लागली की यांची गाडी तयार. गावात काही भांडण झालं की सोडविण्यासाठी यांनी पुढाकार घ्यायचा. इतर शेतकऱ्यांना स्वत:च्या पाईपलाईनमधून पाणी देऊन रब्बीचं पीक घेण्यासाठी प्रोत्साहित करायचे. वनीकरणात सहभाग, पेसा अंतर्गत गावात विकासाची कामे घ्यायची, बाजूच्या पाड्यावरची पाण्याची समस्या सोडवायची अशी त्यांची विविध कामे.
त्यांच्या प्रयत्नाने गाव तंटामुक्त झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात दोन बचत गट सुरू करण्यासही प्रोत्साहन दोंदे यांचेच. पोलीस मित्र म्हणून आपली भूमीका ते निष्ठेने पार पाडतात. गावाच्या विकासाबाबत तळमळीने बोलतात. वडीलांच्या अकाली निधनामुळे वकील बनायची इच्छा अपुरी राहिली असल्याने आता तीन मुलींपैकी एकीला वकील बनविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. गावासाठी लिफ्ट इरिगेशन व्हावे यासाठीदेखील ते प्रयत्नशील आहेत.

ग्रामस्थांनी स्वस्थ बसू नये, सतत कार्यरत रहावे हा त्यांचा आग्रह आहे. एवढे सगळे करूनही ‘मी वेगळे काय करतो, ही माझीच माणसे आहेत’ अशी भावना त्यांचे वेगळेपण स्पष्ट करते.
संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेच्या प्रारंभीच म्हटले आहे-
‘सर्व ग्रामासि सुखी करावे, अन्न-वस्त्र-पात्रादि द्यावे
परि स्वत: दु:खचि भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा’
यातील भावना लक्षात घेतली तर गोटुराम दोंदे यांच्या कार्याचे महत्व लक्षात येईल. या खऱ्या ‘ग्राम’ सेवकाची भेट आनंददायी अशीच होती.
-डॉ.किरण मोघे
                                                                                                                                      

No comments:

Post a Comment