Friday 8 July 2016

एक अनोखी खानावळ
खानावळ आहे, मात्र डिशसाठी चॉईस नाही. इथे बील भरावे लागत नाही. छत नाही, भोवती निसर्ग आहे. येणारा खवय्या कोण असावा हेदेखील निश्चित आहे. इतरांना इथे अनुमती नाही. अशी आगळीवेगळी खानावळ हरसूलजवळील खोरीपाडाच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने वन विभागाने सुरू केली आहे. ‘गिधाड रेस्तरां’ नावाने हा प्रकल्प सुरू झालाय तो नामशेष होणाऱ्या गिधाडांच्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी.
प्रकल्पाची सुरुवात 2011-12 मध्ये करण्यात आली. रत्नागिरीलादेखील असाच प्रकल्प सुरू करण्यात आला. मात्र ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे इथला प्रकल्प अधिक यशस्वी ठरला.
 गावाबाहेर 30 बाय 30 मीटरच्या जागेत दोन  लाख रुपये खर्च रून 120 मीटरची लांब जाळी बसविण्यात आली आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या देखरेखीखाली हा प्रकल्प राबविण्यात येतो. कुत्रे आदी प्राणी इथे जावू नयेत म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली आहे.

परिसरात प्रकल्पाची माहिती देण्यासाठी सुरूवातीस फलकही लावण्यात आले. एखादे जनावर मृत्युमुखी पडले की ग्रामस्थ वनरक्षक किंवा समितीच्या अध्यक्षांना दूरध्वनीद्वारे माहिती देतात. वनविभगातर्फे वाहन पाठवून मृत जनावराची आधी वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी करण्यात येते. नैसर्गिकरित्या मृत्यु झाला असेल तरच ते शव याठिकाणी आणण्यात येते. शवविच्छेदन झाल्याशिवाय कोणताही मृत प्राणी याठिकाणी आणण्यात येत नाही.
पी.के.डांगे. वनरक्षक- जनावरांना विविध कारणांसाठी इंजेक्शन दिले जात असल्याने त्यांच्यावर जगणाऱ्या गिधाडांची संख्या कमी होत असल्याचे लक्षात आले आहे. सध्या अशा इंजेक्शनवर बंदी आणली आहे. मात्र तरीदेखील शवविच्छेदनात विषारी पदार्थ आढळल्यास ते मृत जनावर ‘रेस्तरां' मध्ये आणले जात नाही.



जनावर टाकल्यानंतर साधारण 72 तासांनी गिधाडे येण्यास सुरूवात होते.  प्रकल्प सुरू झाल्यानंतर सुरूवातीस 25 गिधाडे आली होती. त्यात वाढ होत आता ती संख्या 230 वर गेल्याचे वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर शिंदे यांनी सांगितले. ग्रामस्थांचे सहकार्य विशेष कौतुकास्पद आहे. काहीवेळा दुर्गंधी येत असूनही एका विशेष जाणीवेतून त्यांनी प्रकल्पाला सहकार्य केले आहे. नेचर क्लबसारख्या संस्थांनीदेखील गिधाडांची संख्या वाढत असल्याची नोंद घेतली आहे.


शंकर शिंदे हे गावातील आदरणीय असे व्यक्तिमत्व आणि तितकेच प्रेरकही. डोंगरावरील मोरांचे रक्षण करण्यासाठी हे रात्री जागरणही करतात. आयुर्वेदाची जाण असल्याने विविध वनस्पती, मुळांचा शोध सुरू असतो. आरोग्यसेवाही सोबत असतेच. पक्ष्यांकडे कुणी लक्ष देत नाही म्हणून प्रकल्पाकडे वळल्याचे ते सांगतात. मुख्यमंत्री, अमिताभ बच्च्न आदींच्या हस्ते त्यांचा सत्कारदेखील झाला आहे. त्यांच्या वागण्याबोलण्यातील साधेपणा नजरेत भरणारा आहे. ‘मुक्या प्राण्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा’ हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.

गावाने वन संवर्धनासाठीदेखील चांगले उपक्रम राबविले आहेत. संत तुकाराम वनग्राम योजनेत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कारही गावास मिळाला आहे. 30 हेक्टरवर औषधी  आणि फळझाडे लावण्यात आली आहेत. गावकऱ्यांना प्रत्येक रोपाला प्रतिदिन 50 पैसेप्रमाणे संरक्षणाचा खर्च देण्यात येतो. गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने स्थलांतर बंद होवून गावात 7 कुटुंबाची वाढ झाली आहे.
वनविभागातर्फे 86 कुटुंबांना गॅस वाटप करण्यात आले आहे. गावात चराईबंदी आणि कुऱ्हाडबंदी आहे. वन विभागाने सव्वालाख  खर्च करून पाण्याची सोय केल्याने उन्हाळ्यात चिंचवडला पाण्यासाठी जाणाऱ्या गुरांना गावातच पाणी उपलब्ध  झाले आहे. 33 भूमीहिनांना इथे रोजगार मिळाला आहे.
या प्रकल्पाच्या यशात गावकऱ्यांच्या संवेदनशिलतेचा विशेष वाटा आहे. वन विभाबरोबर चांगला समन्वय असल्याने गावाच्या एकूणच विकासालाही गती मिळते आहे. अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेले हे ‘गिधाड रेस्तरां’ पशू-पक्ष्यांचे संवर्धन करणाऱ्यांसाठी प्रेरकच आहे.
                                                                                                                                      

                                *******

No comments:

Post a Comment