Friday 1 July 2016

वेल डन नाशिक!
नाशिकची सकाळच जणू उत्साहाचे वातावरण घेऊन आली. बँडपथक घेऊन शाळांनी काढलेली वृक्षदिंडी, पशु-पक्षांच्या वेशातील चिमुकली मंडळी, वाहनाने रोपे नेण्याची गडबड, सेल्फीसाठी मोबाईल स्टीकचा शोध आणि एका मोठ्या मोहिमेचा आपण भाग आहोत याचा आनंद...
....जिल्ह्यात सर्वत्र असेच वातावरण होते. जिल्ह्याने मिळालेल्या उद्दीष्टापेक्षा स्वत:हून ठरविलेले उद्दीष्ट मोठे होते. मात्र सकाळचे वातावरण पाहिल्यावर ते सहज गाठले जाईल याची सहज खात्री पटली. खरोखर लोकचळवळ काय असते त्याचा प्रत्यय हे पाहिल्यावर येत होता. त्यात नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीष महाजन आणि मालेगाव येथे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे हेदेखील सोबतीने वृक्षारोपण करणार म्हटल्यावर उत्साह वाढणारच.....
.....आपल्या आवडत्या सिनेकलाकारासोबत सेल्फी काढायला मिळाली तर? हा आनंददेखील नाशिककरांना वृक्षारोपणाच्या निमित्ताने घेता आला. विशेषत: बच्चे कंपनी खुष होती. चित्रपट कलावंत मंगेश देसाई आणि दूरचित्रवाणी वाहिनीवरील मालिका नांदा सौख्य भरेचे कलाकार चिन्मय उद्गीरकरसोबत उपस्थित होते. सामाजिक जाणिवेतून त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.
नाशिक येथे वृक्ष लागवड माहिमेच्या जनजागृतीसाठी छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथून रॅली काढण्यात आली. झाडे लावा, झाडे वाढवाचा संदेश देणाऱ्या घोषणा व फलकांद्वारे जनजागृती करण्यात येत होती. पालकमंत्र्यांच्या हस्ते साप्ते येथे जिल्हास्तरीय वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी प्रत्येक घरासमोर झाड लावण्याचे आवाहन करताना नागरिकांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले.
वृक्ष लागवडीत आदर्शवत काम करणाऱ्या पिंपळगाव बहुला येथील जनता विद्यालय परिसरातदेखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मालेगाव येथील टिंघरी येथे सहकार राज्यमंत्री महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, उद्योग संस्था आणि नागरिकांचा सहभाग विशेष असाच होता. ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग इतरांसाठी प्रेरक होता. तर शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग उद्याचे आश्वासक चित्र रेखाटत होता.
....सेल्फीचा आनंद वेगळाच....ही सेल्फी आवडत्या मित्राबरोबर नव्हे, तर जीवनमित्राबरोबरची होती. हे नातं जपण्याचा सल्लादेखील ज्येष्ठांकडून मधूनच मिळताना दिसत होता. चिन्मयनेदेखील विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यात आपण लावलेल्या झाडाची वाढ पाहण्याचे आवाहन केले.
          सायंकाळचा 27 लक्ष 15 हजार वृक्ष लागवडीचा आकडा सर्वांना सुखावून गेला. गेल्या महिन्याभरापासून नियोजन करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांसाठी हा विशेष समाधानाचा क्षण  असणार...आणि का नसावाप्रत्येकाचे वस्तुनिष्ठ उद्दीष्ट ठरविण्यापासून खड्डे कधी खोदायचे, रोपे कधी वाटप होणार, ती न्यायच कशी, कुठून याचे सुक्ष्म नियोजन त्यांनी केले होते आणि आजच्या यशात या नियोजनाचा मोठा वाटा आहेच. पण खऱ्या अर्थाने यश सामुहिक आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्यांचे आहे.
 यश तर मिळाले पण सोबत जबाबदारी आलेली आहे, वृक्षाला मुलाप्रमाणे, मित्राप्रमाणे जपण्याची, त्याची विचारपूस करण्याची, त्याला वाढविण्याची. ही जबाबदारी आपण किती पेलतो यावर उद्याच्या वनाची टक्केवारी अवलंबून आहे. ही तांत्रिक बाजू झाली. खरे तर आपले जीवन अवलंबून आहे, नव्या पिढीचे भवितव्य अवलंबून आहे.....मात्र आजचा उत्साह पाहिला तर ही जबाबदारी सर्वमिळून स्विकरतील,असा विश्वास व्यक्त करायला हरकत नाही. तर मग देऊ या, महिन्यातला एक दिवस आपल्या झाडासाठी...त्याच्यासोबत सेल्फी....करून बघू या....ते वाढेल तसा आपल्याला मिळणारा आनंदही वाढणार आहे. इतर फायदे बोनसच!
राज्य शासनाने एक महत्वाचे पाऊल टाकुन सुरूवात केली आहे. राज्याप्रमाणे जिल्ह्यातील लोकसहभागही उत्साहवर्धक आहे.  सर्वांनी मिळून हरितकुंभ यशस्वी केला. आता हरित नाशिकचे आणि परिणामत: हरित महाराष्ट्राचे स्वप्नही असेच साकार करण्यासाठी कटिबद्ध होऊ या!......वेल डन नाशिक, किप इट अप!

-डॉ.किरण मोघे

No comments:

Post a Comment