Monday 4 July 2016


युवकांची प्रेरणा-स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकांनंदानी युवावस्थेत अपार कष्ट सहन करीत परिस्थितीवर मात केली आहे. ‘नरेंद्र ते विवेकानंद’ हा प्रवास चिकित्सेचा, अभ्यासाचा, अनुभवाचा, प्रेमाचा, ज्ञानाचा,  अवलोकनाचा, त्यागाचा आणि जाणिवेचा तर आहेच, तेवढाच खडतरही आहे.
विवेकानंदांनी शिक्षण, कला, व्यायाम, संगीत, धर्म, तत्वज्ञान, सेवा आदी विविध क्षेत्रात संचार करताना त्यांनी उच्च ध्येय मनाशी बाळगून ते प्राप्त केले. त्यामुळेच युवकांच्या संदर्भात त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरते.
अवघ्या 39 वर्षाच्या जीवनयात्रेत त्यांनी उभे केलेले कार्य अतुलनीय आणि तेवढेच प्रेरक आहे. वयाच्या तीसाव्या वर्षी म्हणजेच आपल्या युवावस्थेत त्यांनी अनंत अडचणींवर मात करीत शिकागो येथे  दिग्वीजय साकार केला. आपल्या ज्ञानाच्या आणि इच्छाशक्तीच्या बळावर भारतीय संस्कृतीची पताका जगभर फडकवली.
आज बऱ्याचदा एखादे कार्य हाती घेतल्यानंतर त्या कार्याच्या यशाविषयी युवक शंका उपस्थित करताना दिसतात. त्यांच्यासाठी विवेकानंदांचे कार्य प्रेरक आहे. ते म्हणतात, अपयशाकडे लक्ष न देता आपले मन सर्वोच्च विचाराने भरून टाका, दररोज त्यांचेच चिंतन करा. यश तुमच्या मागे येईल. एखादी परिक्षा अनुत्तीर्ण होणे म्हणजे जीवनातले अपयश नाही. परिक्षेत नापास झालेल्या अनेक व्यक्तिंनी जीवनात यश संपादन केले आहे, हे विद्यार्थ्यांनी इथे लक्षात घ्यायला हवे. हीच स्वामीजींच्या कार्याची शिकवण आहे.
 स्वामी विवेकांनदांनी समाज जाणून घेण्यासाठी देशभर भ्रमण केले. त्यावेळी त्यांच्याकडे कोणतेही धन नव्हते किंवा साधने नव्हती. गुरुंकडून मिळालेला सेवेचा विचार, आपण विद्यार्थी अवस्थेत अर्जित केलेले ज्ञान, कुटुंबांचे संस्कार आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी हे कार्य सहजतेने केले, हे आपण लक्षात घ्यायला हवे.  ते म्हणतात, भाराभार माहितीने मन भरणे म्हणजे शिक्षण नव्हे तर साधन निर्दोष करणे आणि मनावर ताबा मिळविणे म्हणजे शिक्षक  शिक्षणाद्वारे विद्यार्थी ज्ञानसमृद्ध आणि बलसंपन्न व्हावा तो जीवनातील युद्धांना जिंकणारा व्हावा. ही बलसंपन्नता आणि आत्मविश्वास जीवनात आणणे ही खरे त्यांच्या विचारांचे स्मरण ठरेल.
        स्वामीजींनी मांडलेल्या अद्वैत तत्वज्ञानाचे दोन मुख्य पैलू होते-निर्भयता आणि बलसंपन्नता. आज युवकांसाठी हे दोन्ही पैलू अत्यंत महत्वाचे आहे. स्वामीजी म्हणत, आळसाचा सर्वथैव परित्याग करा. सर्व प्रकारच्या शारिरीक आणि मानसिक दुर्बलतेचा प्रतिकार करा.
आपल्या प्रत्येक कार्याने मनावर संस्कार होत असतात. त्यातूनच चारित्र्य नावाची प्रचंड शक्ती बनत असते आणि चारित्र्यवान माणूसच जीवनात यशस्वी होऊ शकतो. अशा विचारातूनच ते सुभाषबाबुंसारख्या अनेक देशभक्तींची प्रेरणा ठरले आहेत.
        आज माहितीचा विस्फोट होत असताना, ज्ञानाच्या क्षेत्रात अनेक नव्या शोधाची भर पडत असताना युवकांच्या मनातील अस्वस्थता आणि नैराश्य कमी झालेले दिसत नाही. शिक्षणने ज्ञान प्राप्त करून त्यातून जीवनाचा मार्ग सुकर व्हावा अशी कल्पना असते. मात्र शिक्षणाला माहिती संचय इतपत मर्यादीत ठेवल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली दिसते. स्वामीजी त्या संदर्भात म्हणतात, शील बनविणारे, मानसिक शक्ती वाढविणारे,बुद्धी चौफेर आणि विशाल करणारे आणि माणासाला आपल्या पायावर उभे करणारे शिक्षण समाजत अपेक्षित आहे. शासनाच्या कौशल्य विकासाची कल्पना याच विचारावर आधारीत असल्याचे लक्षात येते.
मित्रांनो, शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या जीवनाची प्रेरणा मिळविणे आणि त्या आधारावर पुढील जीवन यशस्वी करणे आपल्या हातात आहे. जीवनाच्या वळणावर यशाकडे जोमाने झेप घेण्याची महाविद्यालयीन शिक्षण ही एकमात्र संधी आहे. विद्यार्थ्याने दु:ख कष्ट सहन करावायास शिकले पाहिजे. त्याद्वारे जीवनाचे धागेदोरे त्यास मिळू शकतात.धोक्यात आणि संकटात त्याने आशा सेाडू नये. श्रम आणि साधनेने जीवन परिपूर्ण बनते आणि यशस्वी होता येते.
 युवकांना संबोधून केलेल्या भाषणात विवेकानंद म्हणतात, या महान विश्वात तीन स्वर ऐकायला येतात-स्वाधीनता, बल आणि समत्व जर तुमच्या स्वाधीनतेने दुसऱ्याला पिडा होत असेल तर ती स्वाधीनता नाही. कोणत्याही प्रकारे हानी करू नका. लोकशाही व्यवस्थेसाठी ऊर्जा, स्वातंत्र्यप्रेम, आत्मप्रेरणा, खंबीरता, कार्यकुशलता, एकात्मता आणि इच्छाशक्ती आवश्यक आहे. समाजासाठी योगदान देण्याची इच्छा असणाऱ्यांना हे विचार प्रेरक असेच आहे. 
अवघ्या 39 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केलेले कार्य युवकांना खरोखर मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांना अभ्यासाची आणि अनुभवाची जोड असल्याने हे विचार आजही मार्गदर्शक ठरतात. या विचारांचे अनुसरण केल्यास बलशाली भारताचे स्वप्न पुर्ण होईल.

No comments:

Post a Comment