Sunday 3 July 2016


अरे पावसा....पावसा...!
आकाशात कालपासून काळे ढग दाटलेत. पावसाच्या सरी कोसळत नसल्या तरी अखेर बरसू  लागल्या आहेत. पुढील काही दिवसात कोसळतीलही. पावसाची सर्वांना प्रतिक्षा होती. तो बरसणारचं होता. थोडा कमी किंवा जास्त....त्यात त्याची काय चुक? निसर्गाचे संतुलन ठरलेले. प्रत्येक घटक आपापली भूमिका चोख पार पाडतो. वारा, समुद्र, नद्या, झाडे, डोंगर, सुर्य....प्रत्येकाचे काम कसे परफेक्ट’! आपण मध्ये लुडबुड केल्यावर तेदेखील काय करणार?.....
....असो, अखेर तो बरसला. त्याच्या स्वागताची करून बळीराजा केव्हाची वाट पहात होता. तो निश्चित सुखावला असणार. शेतीच्या कामाची लगबग आता सुरू होणार. पेरणीला गती येईल. प्रशासनाने 6 लाख 41 हेक्टर क्षेत्रासाठी बी-बियाणे, खते आदींची तयारी केली आहे. 35360 क्विंटल बियाणांचा पुरवठा यापूर्वीच झाला आहे. गेल्या वर्षीच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पावसाचे दमदार आगमन अपेक्षित होतेच. शेतकरीच नव्हे तर सामान्य माणूसही चातकासारखी त्याची वाट पहात होता.
पावसाला सुरूवात झाली. आपल्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्याने मनसोक्त बरसावे. नदी-नाले ओसंडून वहावे. शेतात हिरवं स्वप्न फुलावे. शेतकराच्या घरात समृद्धी यावी. अन्नधान्याचे भरपूर उत्पादन व्हावे. बाजारातून भाजी आणताना पिशवी भरलेली असावी. गोड फळांची चव सामान्यांनाही चाखता यावी......अनेक अपेक्षा आहेत. केवळ पाऊस पडून पुर्ण होणार का? हा पाऊस असाच सुरू राहिल हे चटकन मनात मांडलेले गृहीतक सत्यात परिवर्तीत होणार का? अतिवृष्टी झाली तर? हे प्रश्नही सोबतीला आहेतच.
 पाऊस बरसण्याचे काम करेल. मात्र पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्या शिवारातच राहिल यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. नदी, नाले, तलाव आदींचे खोलीकरण झाले. बंधाऱ्याची कामे झाली. 229 गावात 7600 कामे हाती घेण्यात आली होती. त्या गावांना निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. पुढीलवर्षी आणखी सात हजारावर कामे होणार आहेत.लोकसहभागातून काही धरणातील गाळही काढण्यात आला आहे. गावांनी एकजूटीने यात सहभाग घेतला तर शिवार खऱ्या अर्थाने जलयुक्त होण्यास वेळ लागणार नाही.
पावसाची दुसरी बाजू चिंतेची आहे. अतिवृष्टी झाली तर समस्यांना सामोरे जावे लागते.  पावसाळ्यात जलजन्य आजारही डोके वर काढण्याची शक्यता असते.अशावेळी काळजी घेणे तेवढेच गरजेचे असते. पूरस्थितीत धोक्याच्या स्थानावरून स्थलांतराची तयारी ठेवावी. केवळ पूर पाहण्यासाठी जाऊ नये. पूरात उंच ठिकाणी आसरा घ्यावा. पूरग्रस्त भागातून वाहने चालवू नये. पुराच्या पाण्यात संपर्कात आलेले पदार्थ खावू नये. पाणी उकळून प्यावे. धोका लक्षात येताच प्रशासनाला ताबडतोब कळवावे. अशा उपायांनी आपत्कालीन स्थितीला सक्षमपणे तोंड देणे शक्य होईल.
पाऊस पडतोय म्हणून पाण्याचा जास्त वापरही टाळणे गरजेचे आहे. गेल्या उन्हाळ्याने आपल्याला जलबचतीचा जणू संदेश दिलाय. विंधनविहीरीतून होणारा पाणी उपसा मोठ्या प्रमाणात आहे. या विंधनविहिरींच्या बाजूला पुर्नभरणाची सुविधा केल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. पाणी बचतीसाठी उन्हाळ्याची वाट तरी का पहावी? प्रत्येक दिवसात संवेदनशीलतेने पाण्याचा वापर केल्यास पडणारा पाऊस निश्चितपणे समृद्धी देणारा असेल.
वृक्षारोपणाद्वारे आपण त्याच्या स्वागताची जणू तयारी केली आहे. त्याचे नियमित आणि पुरेसे आगमन ही रोपे वृक्षात रुपांतरीत होण्यावर आहे. ती  जबाबदारी आपण स्विकारली तर तो आपली भूमीका योग्यप्रकारे पार पाडून आपल्याला दरवर्षी आनंद देईल आणि कवीमनाला
अरे पावसा पावसा
कसे वागणे हे तुझे
पूर होणे, दूर जाणे
तुझा कशाचा भरोसा?
 असा प्रश्नही पडणार नाही. त्याऐवजी आपण म्हणू-
अरे पावसा पावसा
पड माझ्या तू शिवारी
तुझ्या येण्याने सफल
जलयुक्तची ही वारी
(आपत्तीच्यावेळी महत्वाचे क्रमांक-0253-2315171/1077/108/102/100)
-डॉ.किरण मोघे



No comments:

Post a Comment