Wednesday 13 July 2016

11 जुलै ते 23 जुलै 2016 या काळात सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे राबविण्यात येत असलेल्या ‘अतिसार नियंत्रण पंधरवाडा’ निमित्त लेख


लहान बालकांतील अतिसार व त्याचे व्यवस्थापन
        जुलै महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आणि खऱ्या अर्थाने पावसाळ्याला सर्वत्र सुरुवात झाली आहे. पाऊस हा जीवसृष्टीसाठी आवश्यक आहे. मात्र पावसाळ्याच्या आगमनासोबतच काही ठराविक आजारांचे प्रमाण आपोआपच वाढते. त्यापैकीच एक म्हणजे अतिसार, हगवण किंवा जुलाब होय.
 अशुद्ध्‍ पाणी, परिसर अस्वच्छता, उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे, उघड्यावरील मलमूत्र विसर्जन, हातांची अस्वच्छता यामुळे  अतिसारास कारणीभूत असणारे अमिबा, शिगेला, कॉलरा, रोटा व्हायरस इत्यादी प्रकारचे रोगजंतू आपल्या शरिरात प्रवेश करतात.
अतिसार म्हणजे एका दिवसात तीन पेक्षा अधिक वेळा पातळ शौचास होणे होय. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व वयोगटांमध्ये अतिसार हा व्याधी उद्भवतो. बऱ्याचदा लहान बालकांमधील अतिसारात नक्की काय करावे हे बरेचदा पालकांना समजत नाही. त्यामुळेच अशा वेळी नेमके कोणते उपाय घरच्या घरी करता येऊ शकतात व आपण काय काळजी घेणे गरजेचे आहे जाणून घेणे महत्वाचे आहे.
        अतिसारामध्ये वारंवार होणाऱ्या जुलाबांमुळे शरीरातील पाणी व क्षारांचे प्रमाण कमी होत असते त्यामुळे थकवा येतो. बाळ चिडचिडे बनते किंवा गळुन जाते. अधिक प्रमाणात जुलाब झाल्यास डोळे खोल जातात. पोटावरील त्वचेला चिमटा घेतल्यास थोड्या वेळाने त्वचा पूर्ववत होणे इत्यादी जलशुष्कतेची लक्षणे दिसून येतात. अतिसाराच्या उपचारामध्ये अतिसाराच्या कारणीभूत रोगजंतूनुसार औषधोपचाराबरोबरच जलशुष्कतेचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. जलशुष्कता म्हणजे शरीरातील क्षार व पाण्याचे प्रमाण कमी होणे होय.
        जलशुष्कतेचे व्यवस्थापन घरच्या घरीदेखील करता येणे शक्य आहे. म्हणूनच जर पालकांना याबाबत ज्ञान असेल तर लहान मुलांमधील अतिसार गंभीर रुप धारण करणार नाही व परिणामी याचा सर्वांनाच फायदा होऊ शकेल.
 जलशुष्कतेचे व्यवस्थापन
     बालकास जर दिवसातून तीन पेक्षा अधिक वेळा वारंवार पातळ शौचास होत असल्यास त्याच्या वयानुसार खालील प्रमाणे उपाय योजना करावी.
        बाळ जर केवळ स्तनपान घेत असेल तर त्यास वारंवार अधिक प्रमाणास व अधिक वेळ स्तनपान द्यावे, बालकाचा आहार बंद करु नये. जर खात असेल तर रोजच्या प्रमाणे घरी तयार केलेला ताजा व स्वच्छ आहार द्यावा. बाळाला क्षारसंजीवनी, ताक, लिंबाचे सरबत, स्वच्छ पाणी, भाताची पेज, भाज्यांचे सुप, शहाळ्याचे पाणी इत्यादी द्रव पदार्थ भरपूर प्रमाणात द्यावेत. क्षारसंजीवनी ओ.आर.एस. अर्थात ‘ओरल रिहायड्रेशन सोल्युशन’ म्हणजे तोंडावाटे द्यावयाचे जलशुष्कता कमी करणारे द्रावण होय. सर्व मेडीकल स्टोअर्स मध्ये तसेच सरकारी दवाखान्यांमध्ये याची पाकिटे उपलब्ध असतात. ओ.आर.एस, क्षारसंजीवनीच्या पाकीटामध्ये ग्लुकोज, सोडीयम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, ट्रायसोडीयम सायट्रेट डिहायड्रेट या क्षारांची पावडर असते.
द्रावण तयार करण्याची पद्धत-
        एक लिटर पिण्याच्या पाण्यामध्ये क्षारसंजीवनी, ओ.आर.एस. चे एका पाकीटातील पावडर मिळसली की क्षारसंजीवनीचे द्रावण तयार होते. नेहमी लक्षात ठेवावे की एक संपूर्ण पाकीट एक लिटर पाण्यात मिश्रित करायचे आहे. एक चमचा किंवा अर्धे पाकीट फोडून वापर करु नये. कारण यामुळे तयार होणाऱ्या द्रावणात क्षरांचे योग्य प्रमाण नसते व त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही.
        बाळाचे वय व वजनानुसार त्यामध्ये योग्य प्रमाणात क्षार संजीवनीचे द्रावण पाजावे. एकदा तयार केलेले द्रावण 24 तासापर्यंतच वापरावे. दुसऱ्या दिवशी गरज असेल तरच नविन द्रावण तयार करावे. आदल्या दिवशीचे द्रावण दुसऱ्यादिवशी वापरु नये. यामुळे जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो.
 वयानुसार क्षारसंजीवनी द्यावयाचे प्रमाण-
        दोन महिन्यापेक्षा कमी वयासाठी 5 चमचे प्रत्येक पातळ शौचानंतर द्यावे.  दोन महिने ते दोन वर्षापर्यंत 1/4 कप ते 1/2 कप प्रत्येक पातळ शौचानंतर आणि  दोन वर्षापूढे 1/2 कप ते 1 कप प्रत्येक पातळ शौचानंतर द्यावे.  क्षारसंजीवनीचे द्रावण बाळाला कपातुन घोट घोट द्यावे, बाळाला उलटी झाल्यास 10 मिनिटे थांबावे व नंतर हळूहळू  द्रावण द्यावे. क्षारसंजीवनीचे द्रावण व इतर द्रव पदार्थ अतिसार थांबेपर्यंत चालू ठेवावे.
औषधोपचार-
        वरील उपायांबरोबरच अतिसारामध्ये औषधापचार करणेही आवश्यक असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते औषधोपचार करावेत आणि त्यासोबतच अतिसार बंद होईपर्यंत क्षारसंजीवनी द्रावण देणे सुरु ठेवावे.
        सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये अतिसार झालेल्या बालकांना ओ.आर.एस. क्षारसंजीवनी बरोबरच शरीराची झीज भरुन काढण्यासाठी झिंकची गोळी किंवा औषधदेखील दिले जाते. अतिसाराची बाधा झालेल्या बालकांना अतिसार बंद झाले तरीदेखील 14 दिवसांपर्यंत दिवसातून एक वेळा झिंक गोळी खाणे आवश्यक आहे.
 हातांची स्वच्छता-
        जुलाब होत असताना हातांची स्वच्छता बाळगण्यालादेखील अतिशय महत्व आहे. अस्वच्छ हातांमुळेच रोगजंतू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारीत होण्यास मदत होते. म्हणूनच शौचानंतर बाळाची शी धूतल्यांनतर, स्वयंपाक करण्यापूर्वी, बाळाला खाऊ घालण्यापुर्वी मुख्यत्वेकरुन बाळाचे व आपले स्वत:चे हात साबण व पाण्याने व्यवस्थित 30 सेकंदापर्यंत स्वच्छ धुणे अतिशय आवश्यक आहे. हात धुतांना हाताचे तळवे, मागची बाजू, बोटांच्या मधील जागा, बोटांची मागची बाजू, बोटांची अग्रे, मनगट इत्यादी भागावर साबण व पाण्याने व्यवस्थित चोळावे व हात स्वच्छ धुवावेत, हात धुण्याबरोबरच वेळच्यावेळी नखे कापणे देखील गरजेचे आहे.
        अशा प्रकारे अतिसार झाला असताना क्षारसंजीवनी द्रावण, झिंक गोळीचे 14 दिवसापर्यंत सेवन व हातांची स्वच्छता या तीन महत्त्वाच्या उपाययोजना केल्यास अतिसाराची तिव्रता व प्रसार आपल्याला निश्चितच कमी करता येईल.
-डॉ.सुप्रिया वेटकोळी-देशमुख
वैद्यकीय अधिकारी
जिल्हा प्रशिक्षण पथक नाशिक      

No comments:

Post a Comment