Wednesday 31 January 2018

शिक्षणाची वारी

शैक्षणिक सुधारणांमुळे राज्य तिसऱ्या स्थानावर- विनोद तावडे


नाशिक, दि.31:- महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या शैक्षणिक सुधारणांमुळे राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर आले आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक व वक्फ बोर्ड, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शिक्षणाची वारी कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, नरेंद्र पवार, शिक्षण संचालक सुनिल मगर, उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, नितीन उपासनी तसेच प्रदिप पेशकार, संदिप झा आदी उपस्थित होते.

श्री. तावडे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी सुरुवात केलेल्या शैक्षणिक सुधारणांचे चांगले परिणाम दिसत आहेत. यापूर्वी महाराष्ट्र देशात 16 व्या स्थानावर होते. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाची अंमलबजावणी चांगल्यारितीने होत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काहीना काही कौशल्य दडलेले असते ते शोधण्याची गरज आहे. यामुळे शालांत परिक्षेत अनुतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निकालानंतर लगेचच पुन:परिक्षा घेणे, गुणपत्रकावर नापास हा शेरा टाकण्याच्या ऐवजी इलीजीबल फॉर स्कील डेव्हलपमेंट’ (कौशल्य विकासासाठी पात्र) शेरा देणे,असे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगीतले.

ते म्हणाले, शाळांमधील शैक्षणिक सुधारणांमुळे 25 हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमधून काढून मराठी शाळांमध्ये पाठविण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला आहे. शिक्षकांना तंत्रज्ञानाचा परिचय करून दिल्याने एक लाख 21 हजार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवताना तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला आहे. शिक्षकांवरील शाळाबाह्य कामाचा ताण कमी व्हावा यासाठी निवडणूक कामांमधून वगळण्यात यावे असे निर्देश देण्यात आल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगीतले.

          श्री.तावडे यांनी शिक्षकांमध्ये जावून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. तसेच शिक्षकांनी सुचविलेल्या नवीन संकल्पनांचा शासनाच्या धोरणंमध्ये समावेश करण्यात  येईल, त्यांनी सांगीतले.
शिक्षणाची वारी कार्यक्रमासाठी शिक्षण पद्धतीमध्ये राबवलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचे, उपक्रमांचे 55 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री श्री.तावडे यांनी स्टॉल्सला भेट देऊन पाहाणी केली. ‘शिक्षणाची वारी कार्यक्रमांतर्गत 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत नाशिकसह पालघर, ठाणे, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, मुंबई, मुंबई उपनगर, धुळे, जळगाव जिल्ह्यांमधील शिक्षक सहभागी होणार आहेत.

00000

No comments:

Post a Comment