Friday 26 January 2018

प्रजासत्ताक दिन

मार्च 2018 पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करणार-गिरीष महाजन

नाशिक दि.26: जिल्ह्यातील नागरी भाग आणि बाराशे ग्रामपंचायती संपुर्णपणे हागणदारीमुक्त झाल्या असून मार्च 2018 पर्यंत संपुर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आायेजित ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री.महाजन म्हणाले, गेल्या वर्षाच्या अखेरीस कुंभमेळ्याचा जागतिक वारसा यादीत समावेश झाला. नाशिक-त्र्यंबकेश्वरचे नाव यानिमित्ताने जगभर पोहोचल्याने अधिकाधीक पर्यटक याठिकाणी भेट देण्यासाठी येतील. त्यादृष्टीने शहर आणि परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नव्या वर्षाची सुरूवात करताना आपल्या जिल्ह्याला, शहराला, गावाला स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत अधिक पुढे नेण्यासाठी  नागरिकांनी संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांसाठी शासनाने राबविलेल्या विविध योजनांचा उल्लेख करताना ते म्हणाले, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला शासनाने महत्व दिले आहे. आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या रुपात शासनाने जाहीर केली. केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळाच्यावतीने उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार राज्याला प्रदान करण्यात आल्याचे श्री.महाजन  यांनी  सांगितले.

          जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून शाश्वत सिंचन व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून नांदूर मधमेश्वर  प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत वाकी आणि भाम धरणाचा समावेश करण्यात आला आहे. कोल्हापुर बंधारा पाणीसाठा धडक मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील चार बंधाऱ्यात 17 दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्यात आले. या मोहिमेमुळे पाणीसाठा क्षमतेत वाढ होऊन सिंचन क्षेत्रही वाढ होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केलाशासनाच्यामागेल त्याला शेततळे’ , कृषी यांत्रिकीकरण अभियान आणि सोलर कृषी पंप वाटपयोजनाचादेखील शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.

          समृद्धी महामार्गाचे काम लवकर सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे नमूद करून पालकमंत्री म्हणाले, या महामार्गामुळे शेतमालाची वाहतूक वेगवान होऊन शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होणार आहे. नाशिक शहर विमानाने मुंबई आणि पुण्याशी जोडल्याने उद्योग आणि पर्यटन विकासासाठी त्याचा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.  मुद्रा योजनेच्या माध्यमातून 80 हजार व्यावसायिक आणि उद्योजकांना चारशे कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आल्याचे ते म्हणाले.
          73 आणि 74 व्या घटनादुरुस्तीमुळे गावपातळीपर्यं लोकशाहीची मुळे घट्ट रुजली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकासाची फळे गावपातळीपर्यंत पोहोचावित, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मौखिक आरोग्य तपासणीत जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले. प्रशासनात ई-सेवेच्या माध्यमातून गतिमानता आणण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगून सेवा हमी कायद्यांतर्गत एक लाख 17 हजार दाखल्याचे वितरण करण्यात आल्याचे श्री.महाजन म्हणाले. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून जुन्या क्षेत्राचा विकास अंतर्गत 573 कोटींची कामे प्रस्तावित करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

----

No comments:

Post a Comment