Wednesday 3 January 2018

‘सिद्धी 2017 व संकल्प 2018’

 लोकसहभागातून ‘जलयुक्त’ला गती- राधाकृष्णन बी.

          नाशिक दि. 3 : जलयुक्त शिवार अभियानात मागील वर्षात  218 गावे टँकरमुक्त करण्यात यश आले असून यावर्षी लोकसहभागातून अभियानाला गती देत 201 गावातील पाण्याची समस्या दूर करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
सिद्धी 2017 व संकल्प 2018’  विषयावर आयोजित पत्रकार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी शशीकांत मंगरुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, जिल्हा सहकार उपनिबंधक निळकंठ करे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, तहसीलदार सी.एस.देशमुख आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, 2016-17 या वर्षात 2018  गावांसाठी  145 कोटी 52 लाख खर्च करुन  सहा हजार 111 इतकी कामे पूर्ण करण्यात आली होती. यावर्षी 201 गावात  चार हजार 439 कामांच्या उद्दीष्टपूर्तीसाठी नियोजन करण्यात आले आहे. विविध स्वयंसेवी संस्था, माध्यम समूह आणि नागरिकांचे अभियानासाठी चांगले सहकार्य मिळत असल्याने यावर्षी उद्दीष्टानुसार काम पुर्ण करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

          ते म्हणाले, राज्यातील मोठ्या जिल्ह्यापैकी एक असूनही नाशिकने विविध क्षेत्रांमध्ये प्रगती साध्य केली आहे. कृषि विकास व शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांची अंमलबजावणी करतांना त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनही प्रयत्नशील आहे. शेतकरी आत्महत्या सारख्या जटील समस्येतून मार्ग काढण्यासाठी केले जात असणारे प्रयत्न महत्वाचे आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी  कुटूंबांना आधार देण्यासाठी रोजगाराची साधने देणे, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देणे, या कुटूंबातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी मदत मिळवून देणे असे उपाय केले जात आहेत.  या प्रयत्नांना व्यापक स्वरुप येण्यासाठी सामाजिक संस्थांबरोबरच माध्यमांनीदेखील पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
          जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा इनोव्हेटीव्ह कौन्सिलच्या माध्यमातून प्रयोगशील विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव देण्याचे काम करण्यात आले असून त्यातूनच त्र्यंबकेश्वर तालुक्यात जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मातृत्व ॲपचा वापर माता मृत्यू रोखण्यासाठी यशस्वीरित्या करण्यात आला. सुरुवातीला काही तालुक्यांमध्ये असलेला हा प्रयोग आता जिल्हाभरात लागू करण्यात येणार आहे. सौरऊर्जेचा वापर करण्याच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनादेखील त्यांचा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

          छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक लाख चार हजार शेतकऱ्यांना 447 कोटी 52 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये मार्च 2018 अखेर जिल्हा पूर्णपणे हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गासाठी एकूण 1293 हेक्टर जमीनीपैकी 1185 हेक्टर क्षेत्राची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे, अशी माहितीदेखील श्री.राधाकृष्णन यांनी दिली.
          प्रशासनातर्फे लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असून जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले,  आधार नोंदणी विशेष कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करुन 2011 च्या निकषाप्रमाणे 100 टक्के आधारनोंदणी झाली आहे. जिल्ह्यात ई-सातबारा आजअखेर 6 हजार 533 ई-सातबारा प्रमाणपत्र वाटप  करण्यात आले आहे.  भूसंपादनाच्या प्रकरणांचा निपटारा लोकन्यायालयाद्वारे करताना उच्च न्यायालयातील 221 आणि जिल्हा न्यायालयातील 68 प्रकरणे निकाली  काढण्यात आली आहे.  नागरिकांच्या सुलभतेसाठी बिनशेती प्रकरणाची जटील प्रक्रीया सुलभ करण्यात आली आहे. औद्योगिक संघटनांच्या सहकार्याने ‘मेक इन नाशिक’ उपक्रमातून मोठ्या उद्योगांना जिल्ह्यात आकर्षित करण्यात यश आले आहे, असे त्यांनी सांगितले.
     जनता दरबारच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना सोडवणूक करण्यासाठी दाखल 365 पैकी 275 प्रकरणांवर कार्यवाही पुर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.  पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानात राज्यात जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असून  मुद्रा बँक योजनेतून 80 हजार 206 लाभार्थ्यांना 399.97 कोटी रुपये कर्ज वितरीत करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी सांगितले.
                                                         ---


No comments:

Post a Comment