Friday 5 January 2018

प्रगती व पुढील दिशा

दुर्बल घटकांच्या विकासासाठी प्रयत्न व्हावेत- दादाजी भुसे

नाशिक  दि. 5 :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकासाची फळे समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहोचवण्याचे आणि दुर्बल घटकांच्या विकासाचे प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
यशवतंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे 73 74 घटना दुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त  ‘प्रगती व पुढील दिशा’ या संकल्पनेवर आयोजित विभागीय परिषदेत ते बोलत होते. कार्यक्रमास विभागीय आयुक्त झगडे, नाशिक जि..अध्यक्षा शितल सांगळे, अहमदनगर जि.प अध्यक्षा शालीनीताई विखे-पाटील, महापौर रंजना भानसी, विद्यापीठाचे कुलगुरु ई.वायुनंदन, मनपा आयुक्त डॉ. अभिषेक कृष्णा, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना, डी. गंगाधरन, पोलीस अधीक्षक संजय दराडे,  विद्यापीठाचे  कुलसचिव डॉ. दिनेश बोंडे, आदी उपस्थित होते.

श्री.भुसे म्हणाले,गेल्या 25 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाही अधिक प्रगल्भ झाली आहे. यानिमित्ताने पंचायतराज व्यवस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतला गेल्यास काळानुरुप बदल घडवून आणता येतील.       वसंतराव नाईक समितीने सुचविलेल्या त्रिस्तरीय रचनेच्या माध्यमातून विकास योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न झाला. घटन दुरुस्तीनुसार शासनाकडील काही विषय स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत.
समाजातील समस्या दूर करण्यासाठी आणि माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याचा हक्क देण्यासाठी घटनेच्या चौकटीत राहून उपाय  शोधण्यात यावे. सकारात्मक दृष्टीकोनातून ग्रामपातळीवरील प्रश्न सोडवावे. भारताला महासत्ता बनविण्याच्या भावनेतून स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज व्हावे आणि जलयुक्त अभियान, स्वच्छ भारत आदी योजनांचे रुपांतर लोकचळवळीत व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 पंचायतराज व्यवस्थेतील कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येक जिल्ह्यात एक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे सुतोवाच केले आहे. परिषदेत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या चर्चेतुन निघणारे सारांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील वाटचालीसाठी महत्वाचे ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री.झगडे म्हणाले, लोकांच्या आशा-आकांक्षा पुर्ण करण्यासाठी 73 व 74 व्या घटनादुरुस्तीच्या फलनिष्पत्तीचा आढावा घेऊन पुढील वाटचाल करणे गरजेचे आहे. मानवी जीवनात विकासाचे अनेक टप्पे आहेत. त्यातुन पुढे जात मानवाने प्रगती साधाली आहे. गेल्या 200 वर्षात प्रगतीचा वेग वाढून 54 टक्के जनता शहरी भागात रहात आहे. पुढील काही वर्षात हे प्रमाण 75 टक्क्यापर्यंत पोहोचेल. ग्रामीण भागातून नागरिक शहरात का जातात, त्यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी तरतूद केली जाते का याचा विचार परिषदेच्या निमित्ताने व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सामाजिक संस्थांचे कार्य सामाजिक न्याय आणि आर्थिक विकासासाठी आराखडा तयार करणे तसेच त्यादृष्टीने योजना राबविणे आहे. केवळ काही योजनांची पुर्तता करून न थांबता सर्वांना सुखी आणि आनंदी करणे हेच या व्यवस्थेचे उद्दीष्ट आहे. त्यादिशेने वाटचाल करताना आनंदाच्या निर्देशांकापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. या वाटेवर गेल्या 25 वर्षात झालेली उद्दीष्टपूर्ती आणि पुढील वाटचालीची दिशा यावर चर्चा व्हावी, असे आवाहन त्यांनी केले. राज्यस्तरीय परिषद झाल्यानंतर राज्यपाल महोदयांच्या सुचनेनुसार विभागीय परिषदेचे आयोजन राज्यभर होणार असून सर्वप्रथम हा मान नाशिकला मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

कुलगुरु वायुनंदन म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकाला मुलभूत सुविधा देण्यासाठी आणि एकंदरीत विकासासाठी शासनाने अत्यंत विचारपूर्वक घटनादुरुस्ती केली आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने ग्रामीण आणि शहरी प्रशासनात बदल घडवून आणण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने परिषदेचे आयोजन करून पुढाकार घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अधिक पुढे नेण्यासाठी परिषद उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद, पं.समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका आणि नगरपालिकेचे आजीमाजी सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमापूर्वी श्री.भुसे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनात निवडणूक आयोग, मुक्त विद्यापीठ, मालेगाव महानगरपालिका आणि पाचही जिल्ह्यातील जिल्हा परिषदांचे एकूण 14 स्टॉल्स उभारण्यात आले आहे. त्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. धुळे जिल्हा परिषदेने सोलर पॅनलच्या माध्यमातून डिजीटल क्लासरूम तर जिल्हा परिषद अहमदनगरने अपंग समावेशित शिक्षण उपक्रमाची माहिती स्टॉल्सच्या माध्यमातून करून दिली. नाशिक जिल्हा परिषदेने ईलर्निंग प्रकल्पाची माहिती  प्रदर्शनाद्वारे दिली.
-----

No comments:

Post a Comment