Sunday 21 January 2018

स्वागत समारंभ

उत्तम वित्तीय व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक-ज.र.मेनन

नाशिक, दि. 21:- शासनाच्या विविध विभागातील उत्तम वित्तीय व्यवस्थापनासाठी संगणकीय प्रणाली आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे, असे प्रतिपादन नवनियुक्त लेखा व कोषागरे संचालक ज.र.मेनन यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन सभागृहात सहसंचालनालय लेखा व कोषागरे आणि महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक पंडीत गवळी, सुहास फरांदे, निवृत्त संचालक सुनिल पिंपळखुटे, माजी संचालक माणिक कवरथी, सतीश बागल, चंद्रकांत पवार, सहसंचालक ल.मा.पाटील,  बाळासाहेब घोरपडे, जिल्हा कोषागार अधिकारी विलास गांगुर्डे,  सहाय्यक संचालक स्वरांजली पिंगळे, राजपत्रित अधिकारी संघटनेचे राजेश लांडे,  शरद मोराणकर आदी उपस्थित होते.

          श्री.मेनन म्हणाले, शासनाचा प्रतिनिधी म्हणून इतर विभागात काम करताना वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी तेथील कामकाजाच्या गुणवत्तेकडे लक्ष देताना अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक विभागाचे  वित्तीय व्यवस्थापन चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी नव्या संकल्पनांचा उपयेाग करावा. त्यादृष्टीने संगणकीय प्रणालीचा उपयोग महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

          संचालक पदावर काम करताना कुटुंबप्रमुख या नात्याने भुमिका अदा करण्याचा प्रयत्न राहील असे सांगताना संचालक पदापर्यंतच्या प्रवासात अनेक चढउतार आल्याचे त्यांनी सांगितले. वित्त व लेखा सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांच्यावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

          श्री.पिंपळखुटे यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या सेवेच्या कारकिर्दीत अनेक चांगली माणसे भेटल्याने चांगली कामगिरी करता आली, असे सांगितले. पूर्वी कामकाजात अनेक अडचणी असायच्या मात्र संगणकीकरणामुळे कामकाज अधिक गतिमान झाल्याचे त्यांनी सांगितले.
          यावेळी उपस्थितांनी श्री.मेनन यांचे स्वागत करताना श्री.पिंपळखुटे यांच्या निवृत्तीनिमित्त यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. दोघा अधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

-----

No comments:

Post a Comment