Wednesday 24 January 2018

सूर्यनमस्कार एक अविष्कार

उत्तम आरोग्यासाठी नियमित सूर्यनमस्कार आवश्यक-गिरीष महाजन

नाशिक, दि.23:-सूर्य हा ऊर्जेचा स्त्रोत असल्याने उत्तम शारिरीक, बौद्धिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित सुर्यनमस्कार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने शकत महोत्सवाचे औचित्य साधत स्व.मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित ‘सूर्यनमस्कार एक अविष्कार’ या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला योगगुरू डॉ.ओमानंद गुरूजी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापौर रंजनाताई भानसी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई.वायुनंदन, संस्थेचे अध्यक्ष विजय काकतकर, कार्याध्यक्ष महेश दाबक, नागनाथ गोरवाडकर, सुनिल कुटे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

श्री.महाजन म्हणाले, भारत तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. बलशाली भारताच्या निर्मितीत तरुणांचे योगदान महत्वाचे असल्याने नवी पिढी व्यसनमुक्त आणि सुदृढ असणे गरजेचे आहे. सुर्यनमस्कारमुळे संस्कार आणि सर्वांगिण व्यायामाचा सुंदर समन्वय होत असल्याने असे तरुण घडविण्यासाठी सुर्यनमस्कार दररोज न चुकता करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सुर्यनमस्कार विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी उपयुक्त असल्याने त्याची  सवय असणे गरजेचे आहे. परदेशातील नागरिकांनी सूर्यनमस्काराचे महत्व ओळखले असून ते मोठ्या प्रमाणात त्याकडे वळले आहेत. देशातील युवकांनी सूर्यनमस्कार  जागतिक पातळीवर नेण्याचे प्रयत्न करताना देशातही हा व्यायाम प्रकार अधिक घट्टपणे रुजेल याकडे लक्ष द्यावे, असेही श्री.महाजन म्हणाले.

डॉ.ओमानंद गुरुजी यांनी सूर्य बल, शक्ती, तेज, ओज, शौर्य, बुद्धी आणि जीवन असल्याचे सांगितले. सुर्याशिवाय सृष्टीची कल्पना शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जीवनातील उद्दीष्ट गाठण्यासाठी नियमित सूर्य नमस्कार करावे, असे आवाहन त्यांनी केले. योगविद्येच्या बाबतीत भारत विश्वगुरु असून 9 देशातील प्रतिनिधींनी उपक्रमात घेतलेला सहभाग त्याचेच द्योतक असल्याचे ते म्हणाले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या 15 हजार विद्यार्थ्यांनी वर्षभर उपक्रम राबवून एक कोटी 45 लाख 95 हजार 786 सूर्यनमस्कार घालण्याच्या विक्रमाची नोंद वर्ल्ड ॲमेझिंग रेकॉर्ड आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. विक्रमाच्या प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री महाजन यांनी इतर मान्यवरांसह स्वत: या उपक्रमात सहभागी होत सूर्यनमस्कार घातले. त्यांनी उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे  आणि संस्थेचे कौतुक केले. संस्थेने 3 फेब्रुवारी 2017 पासून हा उपक्रम वर्षभर राबविला.

---

No comments:

Post a Comment