Thursday 28 February 2019

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

मतदार नोंदणीसाठी  2 व 3 मार्चला विशेष मोहीम

नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना विशेष संधी-जिल्हाधिकारी

नाशिक, दि. 28: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी 2 व 3 मार्च 2019 रोजी  जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नोंदणीपासून वंचित राहिलेल्या अर्हता प्राप्त नागरिकांनी या विशेष संधीचा लाभ घेऊन मतदान प्रक्रीयेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदार नोंदणीसाठी  23 व 24 फेब्रुवारी रोजीदेखील विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी नोंदणी करू न शकलेल्या मतदारांसाठी ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. बीएलओंकडे नमुना क्र. 6, 7, 8 व 8 अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरीकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी  1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल.
सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असून गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिक कल्याण संघटना (रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन- आरडब्ल्यूए) आणि सर्व ग्रामसभांनीदेखील या मोहिमेची माहिती नागरिकांना द्यावी. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीदेखील या मोहिमेत सहभाग घ्यावा.
मतदार ओळखपत्र हे मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असून मतदाराचे नाव मतदार यादीत असेल तरच मतदान करता येणार आहे. मतदार ओळखपत्र असले तरी नागरिकांनी मतदार यादीत आपल्या नावाची खातरजमा करून घ्यावी. विशेषत: 18 वर्ष पुर्ण केलेल्या युवकांनी आणि पात्र दिव्यांग नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in  या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
००००

No comments:

Post a Comment