Wednesday 27 February 2019

समन्वय अधिकाऱ्यांची बैठक


लोकसभा निवडणूकीसाठी समन्वय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

नाशिक दि.27: सार्वत्रिक निवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या या बैठकीस अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, सहाय्यक जिल्हाधिकारी  आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीशी संबंधीत पूर्वतयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, अवैध दारू विक्री विरोधात कडक कारवाई करण्यात यावी. ‘स्वीपकार्यक्रमांतर्गत शाळा-महाविद्यालयांच्या सहकार्याने मतदार जागृतीबाबत कार्यक्रम घेण्यात यावे. कायदा व सुव्यवस्थेबाबत आवश्यक नियोजन करावे. शस्त्र जमा करण्याचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे.

आरोग्य विभाग आणि समाज कल्याण विभाग यांनी दिव्यांग मतदारांची माहिती संकलीत करावी.  दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रीयेची माहिती देण्यात यावी. अशा मतदारांना  मतदान केंद्रापर्यंत आणणे व परत नेण्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी वाहतूक नियोजन करावे. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील एकूण व्हील चेअरची संख्या निवडणूक शाखेस तात्काळ कळवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी म्हणाले, समन्वय अधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणुक व्यवस्थापन आराखडा तयार करावा. 18 ते 19 वयोगटातील मतदारांवर विशेष लक्ष देऊन त्यांची मतदार म्हणून 100 टक्के नोंदणी करावी. जिल्ह्यातील 1400 पेक्षा जास्त मतदार असलेल्या ठिकाणी नवीन सहायकारी मतदान केंद्र स्थापन करावे. मतदान साहित्य वाटप  व स्वीकृती केंद्र निश्चित करावे.
भ्रमणध्वनी आणि इंटरनेट नसलेली ठिकाणे निश्चित करण्यात यावी. मतदान केंद्रावर किमान पायाभूत सुविधा उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करावे. आवश्यक मनुष्यबळ निश्चित करावे. सहायक निवडणुक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रातील सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक दुरुस्तीची कामे त्वरीत करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री.आनंदकर यांनी वाहतूक नियोजनासाठी तयार करण्यात आलेल्यासुगमॲपची माहिती दिली. बैठकीच्या प्रारंभी समस्यांचे समाधान करण्यावर भर देण्याचा संदेश देणारीचित्रफीत दाखविण्यात आली.
----

No comments:

Post a Comment