Wednesday 26 April 2017

स्वस्थ महाराष्ट्र अभियान

स्वस्थ महाराष्ट्र अभियानाद्वारे

                  गरजू रुग्णावर उपचाराची संधी-राधाकृष्णन बी.


नाशिक, दि.26-  पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत पोहोचण्याची व त्याची सेवा करण्याची संधी मिळणार असून चांगले नियोजन केल्यास पथदर्शी अभियानात नाशिक उत्कृष्ट  काम करणारा जिल्हा ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पथदर्शी तपासणी मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील वैद्यकिय रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षणप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, आरोग्य विद्यापीठाचे कुलसचिव कालीदास चव्हाण, उपकुलसचिव विद्या ठाकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे आदी उपस्थित होते.

श्री.राधाकृष्णन  म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या आवाक्यात नसलेल्या शस्त्रक्रीया आणि उपचार मोफत करण्यात येणार आहेत. गरजू रुग्णांना  नामांकित डॉक्टर्स व रुग्णालयाच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील. शासकीय रुग्णालयात नियंत्रण कक्ष (कॉल सेंटर) सुरू करावे, अशी सूचना त्यांनी केली. आरोग्य यंत्रणेतील  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी सेवाभावनेने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यापूर्वी नाशिक येथे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जानेवारी रोजी आयोजित महाआरोग्य शिबीरामध्ये दीड लाख लोकांची तपासणी करुन 50 हजार रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. हे अभियानदेखील त्याच पद्धतीने यशस्वी करण्यासाठी इतरही यंत्रणांचा सहभाग घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

डॉ. जगदाळे म्हणाले, अभियानातील प्रत्येक रुग्णावर उपचार होण्यासाठी शासकीय योजना, उद्योगसंस्थांचा सीएसआर निधी आणि समाजसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. अभियानावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शासनाची सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच निश्चित केलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये अभियानांतर्गत पूर्व तपासणी केली जाईल. अभियानाची माहिती रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी आशासेविका, परिचारीका, अनुलोम ही समाजसेवी संस्था  काम करेल. 

डॉ. वाकचौरे म्हणाले, अभियानात 20 आजारांनुसार रुग्णांची नोंद करण्यात येणार असून त्यांचे वर्गीकरण आणि कार्यवाहीसाठी ‘स्पर्श’ ही संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. महाआरोग्य शिबीरामध्ये पाच दिवसांच्या कालावधीत पूर्व तपासणी करुन  शिबीरासाठी रुग्णांची नोंद करण्यात आली होती. पण या अभियान 1 ते 27 मे दरम्यान राबविण्यात येणार असल्याने  दुर्गम भागातील रुग्णापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. नेहमीच्या आरोग्य योजनेतून उपचार शक्य नसल्यास गरजू रुग्णांना मुख्यमंत्री मदत निधीतून उपचारांसाठी  मदत केली जाईल.

डॉ.डेकाटे म्हणाले, झोपडपट्टीतील गरीब लोकांपर्यंत हे अभियान नेण्यासाठी 1 मे रोजी लोकप्रतिनिधीं, नगरसेवकांच्या सहभागाने नाशिक शहरातील प्रत्येक प्रभागात शुभारंभ कार्यक्रम करण्यात येईल. ठरविण्यात आलेल्या 20 आजारांमध्ये नोंद होऊ न शकल्यास संशयित रुग्ण म्हणून नोंद करण्यात येऊन सर्व रुग्णांपर्यंत लाभ पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
            यावेळी डॉ. वाकचौरे यांनी अभियानाबद्दल माहितीचे सादरीकरण केले तसेच 'स्पर्श' प्रणालीच्या वापराबाबत तंत्रज्ञ श्री.शिंदे यांनी सादरीकरण केले.
 
-----

No comments:

Post a Comment