Wednesday 26 April 2017

सप्तश्रृंग गड स्वच्छता मोहिम

सप्तश्रृंग गड स्वच्छता मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ

नाशिक, दि. 26:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत श्री सप्तश्रृंगगड प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासनातर्फे ग्रामस्थांच्या सहकार्याने  विशेष स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली असून मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी पं.स.सभापती आशा पवार, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी टी.टी.सोनवणे, भुपेंद्र बेडसे, श्री सप्तश्रृंग निवासीनी देवस्थानचे विश्वस्त नाना सुर्यवंशी, पं.स.सदस्य पल्लवी देवरे, सरपंच सुमन सुर्यवंशी, उपसरपंच गिरीश गवळी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते  व्यावसायिकांना कापडी पिशव्या आणि कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. श्री.राधाकृष्णन आणि श्री.शंभरकर यांनी स्वत: स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला. मोहिमेअंतर्गत स्त्री शक्ती महिला बचत गटातर्फे प्रत्येक स्टॉलवर प्लास्टीकमुक्तीचा संदेश देणारे प्लास्टीक बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच  बचतगटाने ग्रामपंचायतीला ना नफा ना तोटा तत्वावर कापडी पिशव्या तयार करून दिल्या आहेत.

माजी उपसरपंच संदीप बेणके यांनी पाच हजार कापडी पिशव्या मोहिमेसाठी  भेट दिल्या. ग्रामपंचायतीतर्फे 15 हजार पिशव्या आणि 50 कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. व्यावसायिकांचे प्लास्टिक न वापरण्याबाबत प्रबोधनही यावेळी करण्यात आले. प्लास्टीकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

स्वच्छता मोहिमेसाठी टोलनाका ते चांदणी चौक, चांदणी चौक ते पहिली पायरी, चांदणी चौक ते मुंबादेवी, पहिली पायरी ते दाजीबा महाराज, पहिली पायरी ते मुंबई चौक आणि शिवालय ते मुंबादेवी अशा सहा भागात स्वतंत्र पथक नेमण्यात आले होते. पथकात अधिकारी, कर्मचारी, नागरिक सहभागी होते.

 प्लास्टिक एकत्रित करण्यासाठी तीन ट्रॅक्टर आणि एक घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली होती. गट विकास अधिकारी कार्यालयातील 86, तहसील कार्यालयातील 40, विश्वस्त मंडळ 55, वन विभाग 7 आणि  सार्वजनिक बांधकाम विभागातील 5 कर्मचाऱ्यांसह 200 नागरिकांनी प्लास्टिक कचरा एकत्रित करण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला. उद्योजक आणि व्यावसायिकांनी तीर्थक्षेत्राचे पावित्र्य आणि सौंदर्य कायम राखण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमात सहभागी होऊन कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

महिन्यातील एक दिवस मोहिम राबवावी-जिल्हाधिकारी

सप्तश्रृंगीगड राज्यातील आदर्श पर्यटनस्थळ व्हावे यासाठी ग्रामपंचायत आणि श्री सप्तश्रृंग निवासीनी देवस्थानने एकत्रितपणे प्लास्टिकमुक्तीची मोहिम राबवावी आणि महिन्यातील एक दिवस निश्चित करून त्यादिवशी नागरिकांच्या सहकार्याने प्लास्टिक कचरा एकत्रित करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी केले.
ते म्हणाले, प्लास्टिक एकत्र करून नाशिक महापालिकेस प्रक्रीयेसाठी देणे शक्य होईल. महापालिका, जिल्हा परिषद आणि प्रशासन यात सामंज्यस्य करार करून ग्रामपंचायतील उत्पन्नाचे साधनही उपलब्ध करून देता येईल. नागरिकांनी प्लास्टिकबंदी मोहिम यशस्वीपणे राबविल्यास गडाचा परिसर सुशोभिकरणासाठी प्रशासनाकडून सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

श्री.शंभरकर यांनी भाविकांना आकर्षित करण्यासाठी आणि गडाचे पावित्र्य राखण्यासाठी प्लास्टिकवर पुर्णत: बंदी आवश्यक असल्याचे सांगितले. सर्वांनी मिळून निश्चय केल्यास गड प्लास्टिकमुक्त होईल आणि त्यातून चांगला संदेश पर्यटकांपर्यंत जाईल, असे ते म्हणाले.
श्री.सुर्यवंशी यांनी देवस्थानतर्फे प्रसादाचे लाडू यापुढे विघटनशील कागदात दिला जाईल, असे सांगितले. भक्तांनादेखील गडावर प्लास्टिक पिशव्या नेण्यास अनुमती दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

----

No comments:

Post a Comment