Friday 21 April 2017

शेततळ्यांमुळे शाश्वत शेतीकडे

शेततळ्यांमुळे निमगावची वाटचाल शाश्वत शेतीकडे


सिन्नर तालुक्यातील निमगाव येथे शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेबरोबरच शेतकऱ्यांनी वैयक्तिक खर्चानेदेखील शेततळी तयार केली आहेत. ‘आत्मा’ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या रोकडेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून विपणन व्यवस्था आणि नव्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांकडून होणारा वापर यामुळे या गावातील शेतकऱ्यांची वाटचाल शाश्वत शेतीच्या दिशेने होत आहे.
गावात प्रारंभी राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत शेततळे तयार करण्यात आले. त्याचा फायदा झाल्याचे पाहून इतरही शेतकरी शेततळ्यांकडे वळले. गावात  ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत 17 शेततळी तयार करण्यात आली. योजनेअंतर्गत आणखी काही  शेततळ्यांचे काम सुरू आहे. इतर 50 विनाअनुदानीत शेततळीदेखील तयार करण्यात आली असल्याने पिकांसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.

पाण्याच्या उपलब्धतेसोबतच नव्या तंत्रज्ञानाचा वापरदेखील शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मल्चिंग,   पॉली हाऊस, शेडनेट आदी सुविधा निर्माण झाल्याने उत्पादकता वाढली आहे. शिवाय वर्षात दोन किंवा तीन पीक घेणे शक्य झाले आहे.  राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियानाचा लाभ 60 शेतकऱ्यांनी घेतला.

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. याच योजने अंतर्गत रोकडेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापण्यात आली. या कंपनीचे 538 सदस्य असून शेतकऱ्यांचे उत्पादन त्यांच्या बांधावरून खरेदी करून ते बाजारापर्यंत नेण्याची व्यवस्था कंपनीमार्फत करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे. या योजनेअंतर्गत डाळ मिल, आर्द्रता मापक यंत्र आणि चाळणी यंत्रदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गावातील 31 शेतकरी सेंद्रीय पद्धतीने शेती करीत आहेत. कोरडवाहू क्षेत्र विकास अंतर्गत विविध प्रशिक्षण सत्र आणि अभ्यासदौऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून त्याचा उपयोग शेतीत बदल घडवून आणण्यासाठी होत आहे. या योजनेअंतर्गत दोन हरितगृह आणि 28 विद्युतपंप देण्यात आले आहेत. सर्व योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी एकूण 1 कोटी 41 लाखाचा निधी कृषी विभागातर्फे वितरीत करण्यात आला आहे. आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे, तालुका कृषी अधिकारी अरुण दातीर, मंडळ कृषी अधिकारी बी.के. सातपुते यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य ग्रामस्थांना उपयुक्त ठरत आहे. अनुभवी शेतकरी जनार्दन सानप आणि नारायण सांगळे यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून गावातील शेतीच्या विकासासाठी नवी दिशा दिली आहे. गावाची वाटचाल शाश्वत शेतीच्या दिशेने सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना कृषी विभागाने पुढाकार घेत दिलेली साथ या प्रक्रीयेत महत्वाची ठरली आहे.
जनार्दन सानप-रोकडेश्वर कंपनीच्या माध्यमातून बांधावर मका, गहू विकत घेतला जातो. मालाचे ग्रेडिंग आणि पॅकींग करून मुंबईच्या बाजारात विक्री केली जाते. त्यामुळे दलालांची साखळी कमी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे. यापुढील काळात प्रक्रीया उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्याला उमेदीन उभे करण्याचे प्रयत्न शासन व कंपनी एकत्रितपणे करीत आहेत.

        गावात तीन कांदा चाळींची उभारणी. 75 मे.टन क्षमता
        दहा शेडनेटची उभारणी.
        उच्च दर्जा भाजीपाला लागवडीसाठी तीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य
         संगणक, वजनकाटे, शिलाई मशिन, पॅकींग मशीन, ग्रेडींग टेबल, के्रट्स आदी एकूण 14 लाखाचे साहित्य वितरीत

----

No comments:

Post a Comment