Monday 10 April 2017

जिल्हा परिषद कार्यशाळा

लोकप्रतिनिधींनी  विकासात महत्वपूर्ण योगदान द्यावे-दादाजी भुसे


नाशिक, दि. 10 :- जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या भागामधील विकासकामांचा प्राधान्यक्रमाने आराखडा तयार केल्यास भविष्यात अंमलबजावणी करणे सोईचे ठरेल. आपल्या भागातील विकासाच्या उत्तम नियोजनाद्वारे त्यांनी जिल्ह्याच्या विकासात महत्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

जिल्हा परिषद व दै.सकाळ वृत्तपत्र समूहाच्यावतीने जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती यांचेसाठी  आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी  ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, दै.सकाळचे संपादक श्रीमंत माने आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री भुसे म्हणाले, शासन जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी 2930 कोटी रुपये देत असून  14 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावातील विकासकामांसाठी  थेट निधी दिला जाणार आहे. सदस्यांनी नियोजनबद्ध कामे केल्यास त्याचा गावांच्या विकासासाठी मोठा उपयोग होईल. स्मार्ट ग्राम योजना, डिजीटल स्कूल प्रकल्प आदी योजनांच्या माध्यमातून गावाचा विकास करणे शक्य आहे.  प्रत्येक सदस्याने आपल्या भागात एक एक मॉडेल गाव निवडून त्याचा विकास करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गावांमधील अविकसीतपणा दारिद्र्य, कुपोषण दूर करुन शेती, पिण्याचे पाणी आदी मुलभूत गरजांच्या पुर्ततेसाठी राज्यातील 100 गावांची निवड करण्यात येईल. तेथील विकासासाठी  विशेष प्रतिनिधींना पाठविण्यात येईल. राज्य शासन व कंपन्यांच्या सीएसआर निधीतून ही कामे केली जातील, अशी माहिती श्री.भुसे यांनी दिली.
अध्यक्षा श्रीमती सांगळे यांनी ग्रामीण भागातील नवीन नेतृत्वाद्वारे विकासाच्या नवनवीन संकल्पना मांडल्या जातील, असे  सांगीतले. मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. शंभरकर म्हणाले, लोकप्रतिनिधींनी योजनांची माहिती घेऊन निधी व विकासकामांचे नियोजन केल्यास विकासाला गती मिळेल. शिस्तबद्धरितीने कामे करण्यासाठी सभागृहातील ठराव, सूचना आदी आयुधांचा वापर कसा करावा याची माहिती कार्यशाळेतून मिळेल. विकासासाठी पदाधिकारी  आणि प्रशासन हे दोन्ही घटक महत्वाचे असून त्यांना एकत्रित काम करणे गरजेचे असते, असे त्यांनी सांगीतले.
श्री. माने म्हणाले, कार्यशाळेच्या माध्यमातून नव्याने निवडलेल्या सदस्यांना कामकाजाची माहिती होण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जात आहे. यापूर्वी महानगरपालिका सदस्यांसाठी अशी कार्यशाळा झाली आहे. पदाधिकारी, सदस्य व प्रशासन यांनी सहकार्याने काम केल्यास जिल्ह्यात मोठी विकासकामे होतील. समन्वयाच्या माध्यमातून सभागृह आपला विशेष ठसा उमटवू शकेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेत अधिकारी , प्रशिक्षक व यशदा संस्थेतील तज्ज्ञ आदींनी विविध विषयांचे मार्गदर्शन केले.

000000

No comments:

Post a Comment