Wednesday 19 April 2017

उद्योग मित्र समिती

औद्योगिक वसाहतीतील भूखंड वाटप प्रक्रीया  अधिक पारदर्शक करावी
                                                      


नाशिक, दि.19 :-औद्योगिक वसाहतीतील भूखंड वाटप प्रक्रीया अधिक पारदर्शक करावी आणि त्याबाबतच्या माहितीला व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.
 जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश रेंदाळकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले,  विविध औद्योगिक वसाहतीतील भूखंड वितरणाची ऑनलाईन प्रक्रीया एकाचवेळी सुरू करण्याबाबत विचार करण्यात यावा. अंबड औद्योगिक वसाहती अंतर्गत एस ब्लॉकमधील भूखंड वितरण प्रक्रीयेसाठी पुरेसा कालावधी देण्याबाबत माहिती सादर करावी. इच्छुक उद्योजकांना पुरेसा कालावधी दिला नसल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास त्याबाबत पुर्नविचार करण्यास सांगण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सातपूर आणि अंबड वसाहतीतील भूखंडाच्या वितरण आणि वापराबाबत माहिती सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 ते म्हणाले, औद्योगिक वसाहतीतील मोकळे भूखंड सुशोभिकरणासाठी उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर  पाच वर्षासाठी देण्याबाबत विचार करण्यात यावा. उद्योजकांनी विघटनशील आणि अविघटनशील कचरा वेगळा करून घंटागाडीकडे द्यावा.  उद्योगांच्या सोईसाठी घंटागाड्यांची वेळ निश्चित करण्यास महापालिकेस सुचना देण्यात येतील, असे श्री.राधाकृष्णन यांनी सांगितले. मालेगाव औद्योगिक वसाहतील उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकांना सर्व सुविधा प्रशासनातर्फे देण्यात येतील, तसेच त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी एक खिडकी व्यवस्थादेखील करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
शहराच्या विकास प्रक्रीयेत उद्योगांचे महत्वाचे योगदान असल्याने उद्योगांना अखंडित आणि सुरळीत विद्युत पुरवठा करण्याबाबत महावितरणने विशेष लक्ष द्यावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. औद्योगिक वसाहत विकसीत  करताना पायाभूत सुविधांच्या निर्मितीकडे विशेष लक्ष द्यावे, अशी सुचना त्यांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी  विविध औद्योगिक वसाहतीतील विद्युत समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन, दूरध्वनी कनेक्शन, दिंडोरी, येवला, सिन्नर, मालेगाव येथील भूसंपादन, पथदीप दुरुस्ती आदींचा आढावा घेतला.
          बैठकीस उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

----

No comments:

Post a Comment