Thursday 6 April 2017

नागरी सुविधा केंद्र

नागरीकांच्या सुविधेसाठी….


शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत नागरिकांना विविध प्रकारचे दाखले व परवानग्या देण्यात येतात. त्याकरीता नागरीकांना विविध विभागात जाऊन सदर परवानग्या व दाखले प्राप्त करुन घ्यावे लागतात. यामध्ये बराच अवधी जातो. नगरिकांचा वेळ आणि खर्च वाचावा यासाठी सर्व परवानग्या व दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक महानगरपालिकेमार्फत नागरी सुविधा केंद्र विकसित  करण्यात आले आहे.

नुकताच या नागरी सुविधा केंद्राचा शुभारंभ महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते नाशिक महानगरपालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे करण्यात आला.  या सुवधे अंतर्गत एकूण 45 सेवांचे संगणकीकरण करण्यात आले. प्रथम टप्प्यात 16 नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित होणार आहे. त्यामध्ये मनपा मुख्यालय, तसेच 6 विभागिय कार्यालये व 9 उपकार्यालयांचा समावेश आहे. मनपा मुख्यालय व 6 विभागिय कार्यालय येथे बुधवारपासून नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित झाले असुन येत्या 2 दिवसांत 9 उपकार्यालय येथे नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित होईल.

या सुविधेसाठी महानगरपालिकेला येस बँकेचे सहकार्य मिळाले असुन बँकेने विनामुल्य मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले आहे. नागरी सुविधा केंद्रामध्ये बँकेमार्फत रोखरहीत व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याकरीता बँकेमार्फत  नागरी सुविधा केंद्रास प्रत्येकी एक पीओएस मशिन उपलब्ध करुन दिले आहे. सद्य:स्थितीत नागरी सुविधा केंद्रे ही प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली असुन ही नागरी सुविधा केंद्र व्यवस्थितरित्या कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात त्याचा विस्तार वाढविण्यात येईल.
या नागरी सुविधा केंद्रात प्राप्त होणार सर्व अर्ज यांची विहीत कालावधीमध्ये कार्यवाही करुन नागरीकांना वेळेत दाखले व परवानग्या देण्यात येतील. नागरी सुविधा केंद्रे हे त्या- त्या विभागातील विभागिय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली कामकाज करणार आहेत. नागरीक आता ऑनलाईन अर्ज भरू शकणार आहेत. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे शुल्कदेखील ऑनलाईन भरता येणार आहे. www.cfc.nmcutilities.in  या   संकेस्थळावर नागरिकांना अर्जाची सुविधा उपलब्ध आहे.

नाशिकची निवड ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ.अभिषेक कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ करण्यासाठी अधिकाधीक सुविधा डिजीटल स्वरुपात उपलब्ध करून कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता राखण्यासाठी महापालिकेने विशेष प्रयत्न सुरू केले आहे. नागरी सुविधा केंद्र हे याच प्रयत्नातील महत्वाचे पाऊल म्हटले पाहिजे.


No comments:

Post a Comment