Monday 24 April 2017

खरीप आढावा बैठक

सिंचन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत शेतीसाठी प्रयत्न-गिरीष महाजन


नाशिक, दि.24 :- शेतकऱ्यांसाठी सिचंनाच्या सुविधा उपलब्ध करून देत आणि शेताच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवून  शाश्वत शेतीद्वारे शेतकऱ्याला समृद्ध करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या  जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक आणि जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय आढावा व सनियंत्रण बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, कृषी सहसंचालक कैलास मोते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप आदी उपस्थित होते.

श्री.महाजन म्हणाले, शेतकऱ्याला पाणी आणि वीज उपलब्ध करून दिल्यास त्याला आर्थिक समृद्धीकडे नेता येईल आणि एकूणच अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत 18 हजार कोटी उपलब्ध झाले आहेत. केंद्राकडे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी आणखी 10 हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे. या माध्यमातून सिंचनाची अनेक अपूर्ण कामे पुर्ण करता येतील. गेल्या दोन वर्षात सिंचनाची अपूर्ण कामे पुर्ण केल्याने आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्याने रब्बी हंगामात उच्चांकी असे 40  लाख हेक्टर सिंचनाखाली आले आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे कृषी उत्पादनात वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांना शेती आरोग्यपत्रिकेसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पीक विमा योजनेच्या निकषातदेखील अनुकूल बदल करण्यात आले आहेत.  खरीप हंगामासाठी पुरेशा प्रमाणात खते आणि बियाणे  उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सुक्ष्म सिचंनाचा उपयोग करीत शास्त्रोक्त शेती केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री म्हणाले, कृषी निविष्ठांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची पद्धत सुरू करून पारदर्शकतेवर अधिक भर देण्यात आला आहे. राज्याच्या अंदाजपत्रकात शेती हाच केंद्रबिंदू मानण्यात आला असून शाश्वत शेतीच्या दिशेने महत्वाची पाऊले उचलण्यात आली आहेत. जिल्ह्यातदेखील शेतकऱ्याने शेततळ्यासाठी प्लास्टीकचा कागद बँकेचे कर्ज काढून घेतल्यास जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून त्याचे व्याज भरण्याची योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. खरीप हंगामासाठी पुरेशा प्रमाणात खते आणि बियाणे यांचा साठी उपलब्ध असल्याचे श्री.महाजन म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा करून निश्चितपणे मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘मेक इन नाशिक’च्या माध्यमातून कृषीपूरक उद्योगांसाठी प्रयत्न
पालकमंत्री म्हणाले, मुंबई येथे होणाऱ्या ‘मेक इन नाशिक’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात कृषीपूरक उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पतंजलिसारख्या उद्योगाशी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. टमाटा, कांदा, द्राक्ष, डाळींब यासारखी उत्पादने घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. दलालापासून शेतकऱ्यांची सुटका व्हावी आणि त्यांना प्रत्यक्षात लाभ व्हावा, असे शासनाचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
लोकसहभागामुळे ‘जलयुक्त’ यशस्वी
शासनाने राबविलेली जलयुक्त शिवार योजना लोकसहभागामुळे यशस्वी ठरली असल्याचे श्री.महाजन यांनी सांगितले. ते म्हणाले, शासन, प्रशासन, सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था, नागरीक यांच्या एकत्रित प्रयत्नातून योजनेला गती मिळाली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक चांगली कामे झाली आहेत. जिल्ह्यात गतवर्षी याचा कालावधीत असलेली टँकरची संख्या 800 वरून 20 पर्यंत कमी झाली आहे. या योजनेच्या लाभाचे विश्लेषण करून ती अधिक परिणामकारक करण्याचे प्रयत्न करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. चांदवड तालुक्याने राज्यस्तरावर मिळविलेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी कौतुगोद्गार काढले. येथील आमदार डॉ. राहुल आहेर आणि चांदवडच्या अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विभागीय आयुक्त श्री.डवले यांची सचिव पदावर मुंबई येथे बदली झाल्याने श्री.महाजन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पदाचा अभिमान न बाळगता गावपातळीवर जाऊन त्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली, अशा शब्दात त्यांनी श्री.डवले यांच्या कामगिरीचे  कौतुक केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत माहिती देणाऱ्या भित्तीपत्रकाचे आणि कृषी सहाय्यक अभिलेख्याचे प्रकाशन करण्यात आले.

बैठकीस आमदार बाळासाहेब सानप, नरहरी झिरवाळ, राजाभाऊ वाजे, जे.पी.गावीत, निर्मला गावीत, दिपीका चव्हाण, अनिल कदम,  योगेश घोलप, जयवंत जाधव  आदी उपस्थित होते.
खरीप हंगामासाठी खत आणि बियाणे पुरेशा प्रमाणात
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप यांनी सादरीकरणाद्वारे खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली. एकूण 87 हजार 847 क्विंटल बियाणांची मागणी असून 3 लाख 83 हजार 187 मे.टन खतांची मागणी आहे. खते आणि बियाणांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात प्रायोगित तत्वावर बियाणे विक्रीसाठी पीओएस यंत्राचा वापर करण्यात येणार असून 1400 यंत्र वाटप करण्यात आले आहेत. 2017 मध्ये 3 लाख 36 हजार 352 आरोग्यपत्रिकांच्या वाटपाचे उद्दीष्ट आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत 83.35 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे डिसेंबर अखेरपर्यंत अर्ज करता येईल, असेही  त्यांनी सांगितले. गावपातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 504 कृषी सहाय्यक कार्यालये सुरू करण्यात आली असून राज्यस्तरावर या ‘नाशिक पॅटर्न’ची दखल घेण्यात आली आहे, असे ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 2016-17 मध्ये 218 गावांचा समावेश करण्यात आला असून एकूण 6 हजार 157 कामांना मंजूरी देण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

----

No comments:

Post a Comment