Monday 27 November 2017

सांसद आदर्श ग्राम

      साल्हेरच्या विकासासाठी  आराखडा तयार करा-डॉ.सुभाष भामरे


          नाशिक, दि.27- सांसद आदर्श ग्राम योजनेतून सटाणा तालुक्यातील साल्हेर या गावाचा संपूर्ण विकास करण्यात येणार असून जिल्हा यंत्रणांनी त्यादृष्टीने परिपूर्ण विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी आज दिले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना, अपर आदिवासी आयुक्त संदीप गोलाईत, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, बागलाणचे तहसिलदार सुनिल सैंदाणे, साल्हेरचे सरपंच दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.

          डॉ.भामरे म्हणाले, साल्हेरच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. केंद्र शासन, राज्यशासन व सीएसआर निधीतून विकासाशी संबंधित पायाभूत कामे , शिक्षण सुविधा, रस्ते, वीज, स्वच्छता अशा सुविधांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. यासाठी उपलब्ध स्त्रोतांचा वापर केला जावा तसेच समन्वयन अधिकारी नेमून कामांना गती दिली जावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
          ते म्हणाले, धुळे जिल्ह्यातील गोंदूर या गावाचा विकास करतांना नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या प्रयत्नांमुळे हे गाव जिल्ह्यातील आदर्श असे ठरुन इतरांसाठी प्रेरणा देणारे झाले आहे. याच धर्तीवर साल्हेर हे आदिवासी भागामध्ये येत असल्याने त्याची निवड करतांना येथील जनता व परिसराच्या विकास मार्गातील अडचणी दूर करुन त्यास प्रगतीपथावर नेण्याचा उद्देश आहे.
          जिल्हाधिकारी म्हणाले, साल्हेरच्या विकासासाठी प्रशासन आवश्यक ती सर्व काळजी घेणार असून बागलाण तालुक्यातील तहसिलदार हे समन्वयन अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्यामार्फत या कामांवर देखरेख ठेवली जाईल. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व प्रमुख उपक्रम साल्हेर येथे राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
 बैठकीस सटाण्याचे गटविकास अधिकारी किशोर भामरे, साल्हेरचे ग्रामस्थ, पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.   

---

No comments:

Post a Comment