Monday 13 November 2017

‘महाखादी’ यात्रा

नागरिकांनी खादीचा वापर वाढवावा-महेश झगडे


नाशिक दि.13-खादीच्या माध्यमातून ग्रामविकासाला चालना मिळत असल्याने नागरिकांनी खादीचा दैनंदिन जीवनातील वापर वाढवावा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘महाखादी’ यात्रेला श्री.झगडे यांनी भेट देवून प्रदर्शनाची माहिती घेतली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राधाकृष्णन, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरूंग आदी उपस्थित होते.

श्री.झगडे यांनी प्रदर्शनात असलेल्या विविध वस्तूंसोबतच सूत कताई यंत्राची सविस्तर माहिती घेतली. खादी प्रसारासाठी  अत्यंत जुन्या पद्धतींची माहिती देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसह चरखा चालवून सूत कताई केली.
सोमवारी यात्रेचा अखेरच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांसह अनेक नागरिकांनी  यात्रेला भेट देऊन चरख्यांविषयी जाणून घेतले. शालेय विद्यार्थ्यानी चरख्याची माहिती घेण्यात विशेष रस दाखविला. विद्यार्थ्यांना चरख्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पेटी चरखा, बुक चरखा, अंबर चरखा, सोलर चरखा, गांधी चरखा आदी चरख्याचे विविध प्रकार एकाच ठिकाणी यात्रेच्या ‍निमित्ताने पाहता आले. खादीच्या विकासातील विविध टप्प्यांची माहिती यानिमित्ताने देण्यात आली.

खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी अनेक योजना व उपक्रम राबविण्यात येतात. त्या माध्यमातून तयार झालेल्या उत्पादनांच्या विक्रीलादेखील चांगला प्रतिसाद लाभला. दुपारपर्यंत दोन लाख 38 हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री करण्यात आली. त्यात खादी कापड, अमरावती सोलर चरख्याने तयार केलेले खास कोट, चपला, हर्बल उत्पादने, मातीच्या वस्तू, तांब्याच्या कलात्मक वस्तू आदींचा समावेश होता. प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांसाठी दिंडोरी तालुक्यातील संस्थेने बनविलेला मातीचा फ्रीज विशेष आकर्षण होते.
राज्यातील एकूण 20 जिल्ह्यांना यात्रा भेट देणार असून नाशिक हा सातवा जिल्हा आहे. प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस प्रदर्शनाचे आयोजन करून खादीचा प्रसार करण्यात येत आहे.

   00000

No comments:

Post a Comment