Wednesday 22 November 2017

जिल्हा ग्रंथोत्सव 2017

ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून नवसाहित्यिकांना चांगली संधी-दादाजी भुसे

नाशिक दि.22-शासनातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हा ग्रंथोत्सवांतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या कवींना आपल्या भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची तसेच नव्या साहित्यिकांना आपली साहित्यकृती वाचकांपर्यंत पोहोचविण्याची चांगली संधी मिळते, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
          मु.शं.औरंगाबादकर सभागृह येथे ‘जिल्हा ग्रंथोत्सव 2017’ अंतर्गत आयोजित कवी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  कवी शरद बोराडे, कमलाकर देसले, लक्ष्मण महाडीक आदी उपस्थित होते.

          श्री.भुसे म्हणाले, कवितेच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक आशय श्रोते आणि वाचकांपर्यंत पोहोचतात. अनेक शब्दात व्यक्त न होऊ शकणाऱ्या भावना एका कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. कवितेच्या या वैशिष्ट्यामुळे कवी विविध विषय समाजापर्यंत प्रभावीपणे पोहचवितात, असे त्यांनी सांगितले. सार्वजनिक वाचनालयाच्या वैभवशाली साहित्य परंपरेचा त्यांनी विशेष उल्लेख केला. ग्रंथचळवळ पुढे नेण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

          प्रारंभी श्री.भुसे यांनी ग्रंथ प्रदर्शनाला  आणि सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली. त्यांच्या हस्ते कवी संमेलनात सहभागी कवींचा सत्कार करण्यात आला.

----

No comments:

Post a Comment