Wednesday 15 November 2017

सिंचनासाठी मागणी

सिंचनासाठी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
          नाशिक दि.15 :-  उर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत असलेल्या पालखेड डावा कालवा 0 ते 110 किमी, ओझरखेड डावा  कालवा, पुणेगाव डावा कालवा, तसेच करंजवण, पालखेड, वाघाड, ओझरखेड, तिसगाव व पुणेगाव धरणाच्या फुगवट्यातील, तसेच जांबुटके व खडकमाळेगाव लघुप्रकल्प आणि रौळसपिंप्री व शिरसगाव कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून पाण्याचा लाभ  घेणाऱ्या पाणी वापर संस्था आणि   शेतकऱ्यांनी आपले मागणी अर्ज 30 नोव्हेंबर 2017 पूर्वी दाखल करावे, असे आवाहन पालखेड पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.
          जलाशयात उपलब्ध  पाण्यातून बिगर सिंचन आरक्षणाचे पाणी  वजा जाता उर्वरित पाणी हे 2017-18 रब्बी हंगाम 15 ऑक्टोबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 मध्ये आपल्या संस्थेच्या देय पाणी कोट्यातून निर्धारित करुन मोठ्या प्रकल्पांसाठी दोन आवर्तनात आणि लघु प्रकल्पांसाठी एक आवर्तनात सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिर्घ मुदतीच्या पाणी वापर संस्थांना रब्बी हंगामात संरक्षित सिंचनाकरीता विहीरीच्या पाण्याची जोड असणाऱ्या उभ्या पिकांसाठी दोन आवर्तनात सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
 अधिक पाणी लागणाऱ्या पिकास पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी  संबंधीत  लाभधारकाची राहील. पाणी वापर संस्थांनी आपले नमुना नंबर 7 चे पाणी मागणी अर्ज 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत नजीकच्या शाखा कार्यालयात सादर करावे.
पाणी वापर संस्थांनी त्यांची थकबाकी भरल्याशिवाय पाणी मागणी अर्ज मंजूर केला जाणार नाही. संस्थांनी त्यांच्या हद्दीतील शेतचाऱ्या सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. नादुरूस्त शेतचाऱ्यातून पाणी पुरवठा केला जाणार नाही. शेतचारी अभावी पाणी न मिळाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही.
 नियमाप्रमाणे मागणी न करता पिकास पाणी घेतलेले आढळल्यास पाणी वापर अनधिकृत समजून उभ्यापिकाच्या क्षेत्राचा अनधिकृत पाणी वापराचा पंचनामा करण्यात येईल. मंजूर उपसा धारकांव्यतिरिक्त इतरांनी इलेक्ट्रीक मोटार,ऑईल इंजिन अथवा पाईप लाईनने पाणी घेतल्यास महाराष्ट्र सिंचन कायद्यानुसार साहित्य जप्त करून कार्यवाही करण्यात येईल.
 उपलब्ध  पाण्यापेक्षा पाणी मागणी जास्त असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करणे बंधनकारक राहील. शेतकऱ्यांनी अर्जासोबत चालू वर्षाचा सातबारा उतारा जोडणे बंधनकारक आहे. मुदतीनंतर आलेले अर्जाचा विचार केला जाणार नाही. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून कृषि उत्पादन वाढवावे, असे आवाहन गा.मो.बाविस्कर, उपकार्यकारी अभियंता पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक यांनी केले आहे.

----

No comments:

Post a Comment