Saturday 25 November 2017

बालभारती सुवर्ण महोत्सव

बालभारतीच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा अतिरिक्त पगार
सुवर्णमहोत्सवी सांगता समारोहात विनोद तावडे यांची घोषणा


नाशिक दि.25- बालभारतीची वैभवशाली परंपरा यशस्वीरित्या पुढे नेत असल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार तर पेन्शनधारक निवृत्त कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे पेन्शन आणि एक हजार रूपये वाढ भेट म्हणून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक व वक्फबोर्ड, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली. ही भेट म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रेमाने व्यक्त केलेल्या भावना आहेत, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती  व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे गुरू गोविंदसिंग फाऊंडेशन शाळेत आयोजित बालभारती सुवर्ण महोत्सवी सांगता समारोह आणि नाशिक भांडार नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, जयवंतराव जाधव , श्रीमती वर्षा तावडे  बालभारतीचे संचालक सुनील मगर, सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, गुरू गोविंदसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष गुरूदेवसिंग बिरदी, हरजितसिंग, बलविरसिंग,  शिक्षण  उपसंचालक रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते.
 श्री. तावडे म्हणाले, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित करण्यात बालभारतीचे मोठे योगदान आहे. त्यामुळे बालभारती उपक्रमाची  माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या बालभारतीची रचना पाहण्यासाठी सहलीच्या माध्यमातून त्यांना न्यायला हवे,  अशी सुचना त्यांनी केली.

ते म्हणाले, 1980 मध्ये पाश्चात्य राष्ट्रात ज्ञानरचनावाद स्वीकारला गेला. मात्र भारतात त्याचा स्वीकार 2006 मध्ये झाला. राज्य शासनाने त्यानुसार अभ्यासक्रमांची रचना करणे सुरू केले असून कौशल्याधारित शिक्षणाला महत्व दिले जात आहे. त्यामुळे मुलांना ज्ञान ग्रहण करणे सोपे झाले आहे. पुस्तकातील अभ्यासक्रम  बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना गाईडशिवाय परिक्षेला बसता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 श्री तावडे म्हणाले की, शासनातर्फे ई-बालभारती हा महत्वाकांक्षी प्रकल्प  राबविण्यात येत आहे. पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमात ई-लर्निंगचा समावेश करण्यात येणार आहे. उद्योजकांच्या सहकार्याने राज्यातील एक लाख सहा हजार शाळांमध्ये मोफत डिजीटल कनेक्टीव्हीटी  उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ई- लर्निंगमुळे विषय समजून घेणे विद्यार्थ्यांना सोपे जाईल आणि दोन कोटी विद्यार्थ्यांना असा अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य ठरेल, असे त्यांनी सांगितले.

श्री. तावडे यांच्या हस्ते, नाशिक भांडार इमारतीचे उद्घाटन आणि किशोर मासिकाच्या डिजिटायझेशन उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. बालभारतीच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी बालभारतीमधील कवितांवर आधारीत तयार केलेल्या हस्तलिखित ‘बालमनोन्मेश’चे प्रकाशनही श्री.तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी स्वप्नील बांदोडकर यांनी  'श्रावणमासी'  ही कविता सादर केली तसेच गणिताच्या सुत्रावर अधारित ‘सुत्राचा हा खेळ मांडियेला’ हे गीत सादर केले. गणितातील सुत्रे आणि मराठीतील कवितांना नवा संगीत साज देऊन नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पाठ्यपुस्तक मंडळाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्तविकात श्री. मगर यांनी गेल्या वर्षापासून बालभारतीने आठवी ते दहावीची पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यास सुरवात केली असल्याचे सांगितले. बालभारतीचा ठेवा पुढच्या  पिढीपर्यंत नेण्यासाठी डिजिटायझेशन  उपक्रम हाती घेण्यात आल्याचे ते म्हटले.
क्षणचित्रे-
·        *उद्घाटन  आणि प्रकाशनाच्यावेळी मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्या हस्ते उद्घाटन आणि कॉफीटेबल बुकचे प्रकाशन केले.
·    *स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या गीतांचा विद्यार्थ्यांनी भरपूर  आनंद घेतला आणि त्यांना आवडीचे गाणे गायला सांगितले. स्वप्नीलने त्यांना नाराज न करता विद्यार्थ्यांना कोरससाठी सोबत घेत गाणे गायिले.
·        *मंत्री महोदयांनी संवाद साधल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह होता.
·        *श्री.तावडे यांनी भाषणाच्या सुरूवातील बालभारतीचे नाव बदलायचे काय, असा प्रश्न विचारला. सर्व विद्यार्थ्यांनी एकमुखाने नकार दिल्यावर ‘आजच्या बैठकीत बालभारती असेच नाव राहील असे ठरले’ असे श्री.तावडे यांनी सांगिताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाटाने त्यांचे स्वागत केले.
वर्गातले ज्ञान आत्मसात करा
मंत्री महोदयांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

विद्यार्थ्यांशी संवादासाठी वेळ हवा असल्याने श्री.तावडे यांनी आपले भाषण लवकर संपविले. लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणे हा लोकशाहीतील अधिकार आहे असे सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना मोकळेपणे प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीदेखील त्यास प्रतिसाद देत कॉपी प्रकरणामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा फायदा होत नाही, वर्गात शिकविले जात नाही तर क्लासलाच जास्त वेळ दिला जातो, रोजगाराचा प्रश्न, आठवीपर्यंत मुलांना उत्तीर्ण केल्याने गुणवत्ता ढासळते असे अनेक प्रश्न मांडले. मंत्री महोदयांनी त्यांना तेवढ्याच मोकळेपणाने उत्तरे दिली.
ते म्हणाले, कॉपी प्रकार बंद करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. मात्र कॉपी करणाऱ्यांना भविष्य नसते. खरा अभ्यास करणारे स्पर्धेत यशस्वी होतात. वर्गात मिळणाऱ्या शिक्षणामुळे विषय समजावून घेता येतो. त्यामुळे पुढील वर्षापासून बारावीच्या  वर्गासाठी बायोमॅट्रीक उपस्थिती नोंदविण्यात येणार आहे. उपस्थिती कमी असणाऱ्यांना परिक्षेस बसता येणार नाही. इन्टिग्रेटेड क्लाससेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
रोजगाराभिमुख शिक्षण असावे यासाठी अभ्यासासोबत कौशल्यविकासाला महत्व देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. एका विद्यार्थ्याने पेपर लिहिण्यासाठी तीन तासाचा वेळ कमी असल्याबात तक्रार केली असता शिक्षण तज्ज्ञांपर्यंत ही समस्या पोहोचवून त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

                                      बालभारतीविषयी थोडे...


स्थापना-

·   पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारांनी व्यावसायिक तत्वावर चालणारी स्वायत्त संस्था स्थापन करावी अशी कोठारी आयोगाची  शिफारस.
·      त्यानुसार 27 जानेवारी 1967 रोजी ' महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ' स्थापन.
उद्दीष्टे-
·        शालेय शिक्षणाच्या  अभिवृद्धीसाठी साहाय्य व उत्तेजन. शालेय पाठ्यपुस्तके, शिक्षकांकरिता हस्तपुस्तिका, मार्गदर्शिका, विद्यार्थ्यासाठी स्वाध्याय पुस्तिका, शैक्षणिक साहित्याची निर्मिती.
·        पाठ्यपुस्तके ,शैक्षणिक  साहित्याची छपाई, प्रकाशन, साठा, वितरण व विक्रीची व्यवस्था
पाठ्यपुस्तके-
·        पहिली ते आठवी इयत्तांसाठी आठ भाषांतून सचित्र व रंगीत पाठ्यपुस्तके.
·        मान्यवर लेखक-कवी, विचारवंत, तसेच प्रतिभावंत कलाकारांचा पाठ्यपुस्तक निर्मितीत सहभाग.
·        पुस्तकांचा आशय व आकारात कालानुरूप बदल.


पाठ्येत्तर उपक्रम
·        पूरक वाचन साहित्याच्या निर्मितीवर भर देणारे एकमेव  पाठ्यपुस्तक मंडळ.
·        भारतीय स्वातंत्रलढा, महापुरषांची चरित्रे, आदर्श शिक्षकांच्या आत्मकथा, बालगीते, संस्कारकथा, खेळ, स्फुर्तिगीते आदी पुरक साहित्य प्रकाशित.
·        स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती.
किशोर
·        46 वर्षापासून मुलांचे आवडते मासिक.
·     अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान देण्याबरोबरच मुलांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावे ही भूमिका.
·   दिवाळी अंक , सुटी विशेषांक, वाचकप्रिय. किशोर मासिकातील निवडक साहित्याचे 14 खंड प्रकाशित
ग्रंथालय
·        मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराथी, तेलगु या आठही भाषांतील एक लाख 37 हजार 622 पुस्तकांचा मधुसंचय.
·    विविध विषयांची 177 देशी-विदेशी नियतकालिके. सन 1836 पासूनची दुर्मिळ पाठ्यपुस्तके, विविध राज्ये तसेच देशांतील पाठ्यपुस्तके, नकाशे, पाच हजार कोश, गॅझेटियर्स, जनगणना अहवालांचा खजिना.
इंग्रजी
·        मातृभाषेसोबत पहिलीपासून इंग्रजीचे शिक्षण.
·        जुन 2000 मध्ये 'माय इंग्लिश बुक 'चे पहिले पुस्तक लागू.
·        इंग्रजी शब्दसोबत देवनागरी लिपीतील उच्चारण हे पुस्तकाचे वैशिष्ट्य.
·        विद्यार्थी-शिक्षकांसाठी 2005 मध्ये इंग्रजी- मराठी सचित्र शब्दकोश.

ई-बालभारती
·   पोर्टलवर बालभारतीचे फॉन्टस, 'मराठी बालभारती' च्या चार मालांची  पाठ्यपुस्तके, 2006 पासूनच्या पाठ्यपुस्तकांचा 'पीडीएफ' उपलब्ध
·        2013-14 पासून निर्मिती विभागाचे कामकाज 'ओपीएस' संगणक प्रणालीमार्फत.
·  छपाईसाठी ‘सीटीपी’ तंत्रज्ञानाचा वापर. भविष्यात सर्व्हरमार्फत मुद्रकांना पाठ्यपुस्तक पीडीएफ देण्याचे नियोजन.


----

No comments:

Post a Comment