Wednesday 29 November 2017

वेस्ट टू एनर्जी

प्रदुषण समस्या टाळण्यासाठी घनकचऱ्यावर प्रक्रिया आवश्यक-गिरीष महाजन


नाशिक, दि.29- महानगरांमधील प्रदुषण आणि आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी तसेच स्वच्छ, सुंदर व दुर्गंधीमुक्त शहर निर्माण करण्यासाठी घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व  लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
भारत सरकार महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगरपालिका यांनी संयुक्तपणे उभारलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिषेक कृष्णा, जर्मनीच्या जीआयझेड कंपनीचे अर्णे पानेसर, डर्क वॉल्टर, हेरॉल्ड, भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशनचे संचालक नवीन अग्रवाल, महाराष्ट्राचे संचालक उदय टेकाळे, दिनकर पाटील,अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.

 श्री.महाजन म्हणाले, महानगरातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न वाढत्या शहरीकरणामुळे गंभीर होत चालला आहे. त्यामुळे कचऱ्यापासून पर्यावरणपुरक निर्मिती करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. त्यासाठी विविध देशांचे सहकार्य घेण्यात येत आहे. शासनाच्या या प्रयत्नांना नागरिकांची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून नागरिकांनी ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करुन कचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन त्यांनी केले.

 भविष्यात या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचा विस्तार करण्याचे प्रयत्न करण्यात येतील असेही श्री.महाजन म्हणाले. राज्यातील अशा स्वरुपाचा हा पहिलाच प्रकल्प असल्याचे त्यांनी संगितले.

 श्रीमती भानसी म्हणाल्या, जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत जर्मन सरकार व भारत सरकार यांचे संयुक्त प्रयत्नातून नाशिक शहरामध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पाकरिता जर्मनीच्या जीआयझेड कंपनीकडून  तांत्रिक व आर्थिक सहकार्य मिळाले आहे.

 सदर प्रकल्पात दररोज सुमारे 15 ते 20 मेट्रीक टन ओला कचना व 10 ते 15 मेट्रीक टन सार्वजनिक शौचालयातील मल जल असे एकूण 30 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगॅस/मिथेन गॅस तयार करुन त्याद्वारे वीज निर्मिती करण्यात येणार आहे. नाशिक महानगरपालिकेस दरमहा सुमारे 99 हजार युनिट इतकी वीज पुरविणार आहे. प्रकल्पात तयार झालेली वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पॉवर ग्रीडला जोडण्यात येणार असून जेवढी वीज पॉवर ग्रीडमध्ये टाकण्यात येईल तेवढे युनिट मनपास इतर वीज देयकातून सुट मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
 प्रास्ताविकात जीआयझेडच्या जितेंद्र यादव यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.         
---


No comments:

Post a Comment