Wednesday 22 November 2017

कवी संमेलन

नाशिक जिल्हा ग्रंथोत्सव 2017
कवितेच्या सरींनी श्रोते झाले चिंब


नाशिक दि.22- जिल्हा ग्रंथोत्सवांतर्गत  मु.शं.औरंगाबादकर सभागृह येथे आयोजित कवी संमेलनात जिल्ह्यातील कवींनी सादर केलेल्या कवितांना श्रोत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. बाप-लेकीच्या प्रेमळ नाते, मानवी जीवनाचे विविध पैलूंसह  शेतकऱ्याच्या व्यथा कवींनी आपल्या कवितेतून मांडल्या. ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे हेदेखील या काव्यसोहळ्यात रमले आणि त्यांनी कवितांना तेवढीच उत्स्फुर्त दाद दिली.

कवी डॉ. शंकर बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कवी संमेलनाच्या प्रारंभीच प्रशांत केंगणे यांनी बाप-लेकीचे नाते कवितेतून मांडताना हळूवार श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श केला.
लेक काळीज बापाचे काळजाची ती प्रेरणा,
तिच्या पायात शोधतो बाप लक्ष्मीच्या खुणा
कुणी ऐकला का सांगा कधी बापाचा हंबर
लेक सोडताना घर त्याचे फुटते अंबर
अशा ओळी ऐकताना श्रोत्यांच्या डोळ्यात अलगद अश्रु तरळले.
 राजेंद्र उगले यांनी  विठूरायाकडे पाय थकल्याने आता पंढरीची वारी होत नाही अशी तक्रार करतानाभक्तीभावाला जागून सारा शिवार डुलव असा आर्जव करणाऱ्या वारकरी शेतकऱ्याच्या भावना आपल्या कवितेतून मांडल्या.
संदीप जगताप यांना पुस्तकासाठी पुरस्कार नको होता. त्यांनी कवितेतून त्यापेक्षा वावरातल्या पिकाला जास्त भाव मिळावाअशी इच्छा व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या जीवनातला आशावाद त्यांनी  पानं गळून गेले तरी जीवंत आहे खोड, थोडी मिळाली की ओल तर मातीतून परत फुटतील मोड अशा शब्दातून प्रकट केला.

रविंद्र कांगणे यांनी हिशेब या आपल्या कवितेतून नशा पैशाची गांजील भोग डसाया येतील, तुझ्या तिजोरीचा वाटा काय यमाला देशील असा प्रश्न उपस्थित करताना मानवी संवेदना जपण्याचा संदेश दिला. तर अरुण इंगळे यांनी दु:ख बाजूला सारून जीवनाचा आनंद घेण्याचा संदेश कवितेतून दिला.

रविंद्र मालुसकर यांनी सादर केलेल्या कवी राम पाठक यांच्या नाशिकच्या कवितेने श्रोत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. विलास पगार यांनी शेतकऱ्यांच्या श्रमाची जाणीव समाजाने ठेवावी ही भावना श्रीमंत भावाला उद्देशून केलेल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली.तुझी आभाळी नजर त्याला मातीचीच गोडी या त्यांच्या ओळींना उत्स्फुर्त दाद मिळाली.

 कमलाकर देसले यांनी गझल सादर केली. माणूस होण्याचा मी घेईन अवसर नक्की, मला ईश्वरा करुणेचा दे पाझर नक्की अशा ओळी सादर करतना जुन्या आयुष्याचे क्षण मागायलादेखील ते विसरले नाहीत.
लक्ष्मण महाडीक यांच्या सुंदर सूत्रसंचालनाने मैफीलीत रंग भरला. समाजाकडून महिलांवर टाकली जाणारी बंधने प्रतिकांच्या माध्यमातून मांडताना पोरी तुला तुझ्यातून मुक्त झालं पाहिजे, आणि तुच तुझ्या आयुष्याचं नवं सुक्त लिहिलं पाहिजे असे आवाहन त्यांनी कवितेतून केले.
समारोपात डॉ. शंकर बोराडे यांनी कॉपी प्रकरणावर मार्मिक भाष्य असलेली कविता सादर केली. आपल्या अटी-शर्ती या कवितेतून त्यांनी समाजातील प्रथा-परंपरांवर भाष्य केले.
काही नवकवींनीदेखील आपल्या रचना उत्स्फुर्तपणे सादर केल्या.

-----

No comments:

Post a Comment