Wednesday 22 November 2017

जिल्हा ग्रंथोत्सव 2017

ग्रंथदिंडीने जिल्हा ग्रंथोत्सवाचा शानदार शुभारंभ

नाशिक दि.22-शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या शानदार ग्रंथदिंडीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान जि.प. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने  मु.शं.औरंगाबादकर सभागृह येथे आयोजित ‘जिल्हा ग्रंथोत्सव 2017’ चा शुभारंभ करण्यात आला. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन महापौर रंजनाताई भानसी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावीत, सा.वा.ना.चे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, साहित्य परिषदेचे उन्मेश गायधनी, जिल्हा ग्रंथालय संघाचे रामचंद्र काकड, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, वसंतराव खैरनार, सहाय्यक ग्रंथालय संचालक आशिष ढोक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह दत्ता पगार, ग्रंथपाल कविता महाजन आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमती हिरे यांनी वाचनाची सवय व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचे विविध स्त्रोत उपलब्ध असतानादेखील जीवन समृद्ध करण्यासाठी पुस्तकांचे महत्व कायम आहे, असे त्या म्हणाल्या.
श्रीमती सांगळे यांनी नव्या पिढीला वाचनाकडे वळविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यशस्वी होण्यासाठी जीवनात ग्रंथांचे महत्वाचे स्थान असून वाचनाने नवे विचार स्फुरतात आणि ज्ञानकक्षा रुंदावतात, असेही त्यांनी सांगितले.

 श्रीमती भानसी यांनी ग्रंथप्रेमी वाचकांसाठी शहरात जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी ग्रंथालय उभारणार असल्याचे सांगितले.
श्रीमती गावीत यांनी बालपणापासून वाचनाची सवय जडणे आवश्यक असल्याचे सांगितले. वाचनाला भाषेचे बंधन नसून त्यापासून मिळणारा आनंद वेगळाच असतो, असे त्या म्हणाल्या.
श्री.बेणी यांनी सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. वाचन चळवळ गतीमान करण्यासाठी ग्रंथालयातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.गायधनी यांनी आदिवासी भागात ग्रंथ पोहोचविण्यासाठी साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे लवकरच उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ.मोघे आणि श्री.जोपुळे यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागची भूमकी विषद केली.

ग्रंथोत्सव दोन दिवस चालणार असून यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत प्रदर्शनात पुस्तक विक्री सुरू राहाणार आहे. गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता  ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे ‘ग्रंथाने काय दिले’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तर दुपारी 3 वाजता डॉ.संजय अपरांती यांचे ‘स्पर्धा परिक्षेचे विश्व’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
नागरिकांनी कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीतर्फे करण्यात आले आहे.

----

No comments:

Post a Comment