Thursday 30 November 2017

निवडणुक आढावा बैठक

‘कॉप’ ॲपच्या सहाय्याने निवडणुक प्रक्रीयेत जनतेचा सहभाग वाढवा-सहारिया


नाशिक, दि.30-  राज्य निवडणुक आयोगाने नगरपालिका निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी  ‘सिटीझन ऑन पेट्रोल’ (कॉप) हे मोबईल ॲप्लिकेशन तयार केले असून हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जागरूक नागरिक आणि अधिकाऱ्यांना या सुविधेचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन राज्य निवडणुक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी केले.
इगतपुरी येथे त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि सटाणा येथील प्रभाग क्र.5-अ च्या पोटनिवडणुकीच्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपरजिल्हाधिकारी निलेश सागर, पोलीस अधीक्षक संजय दराडे, निवडणुक उपायुक्त अविनाश सणस, उपजिल्हाधिकारी शशीकांत मंगरुळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, निवडणुक निरीक्षक ज्ञानेश्वर खिल्लारी आणि प्रकाश वाघमोडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

श्री.सहारिया म्हणाले, या ॲपच्या माध्यमातून जनतेला लोकशाहीच्यादृष्टीने सक्षम करण्याचे कार्य करण्यात येत आहे. ॲपवर येणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेण्यात यावी. अॅपच्या वापराबाबत निवड केलेल्या नागरिकांना प्रशिक्षण देण्यात यावेनागरिकांनी न घाबरता तक्रार केली तर आदर्श निवडणुक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीनंतर स्वतंत्र संस्थेमार्फत ॲपच्या उपयुक्ततेचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याबाबत सुचना देताना ते म्हणाले, मतदान केंद्रात जाताना मतदाराला उमेदवारांची माहिती देण्यासाठी ठळक अक्षरात माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे. ट्रु वोटर ॲपद्वारे उमेदवाराच्या निवडणुक खर्चाची बारकाईने तपासणी करण्यात यावी. आदर्श मतदान केंद्र तयार करण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. अपंगांसाठी रुग्णवाहिका आणि व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणुक प्रक्रीयेत सहभागी अधिकाऱ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा सक्षमपणे वापर करावा, असे श्री.सहारिया म्हणाले.

श्री.सणस म्हणाले, ‘कॉपच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारीबाबत तक्रार करणाऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे. या ॲपचे आंतरराष्ट्रीय परिषदेत 53 राष्ट्रांनी कौतुक केले असून ॲपबाबत माहिती जाणून घेतली आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरपासून त्याचा प्रायोगिक तत्वावर उपयोग करण्यात येत असून तो यशस्वी ठरल्यास राष्ट्रीय पातळीवर मार्गदर्शक ठरेल, असे त्यांनी सांगितले.
श्री.दराडे यांनी पोलिस विभागाने केलेल्या पुर्वतयारीची माहिती दिली. निवडणुकीसाठी एक एसआरपी कंपनी आणि 200 होमगार्डची  मागणी वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.सागर यांनी, निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारी योग्यप्रकारे पारा पाडावी, असे आवाहन केले. कॉपमुळे नागरिकांना या प्रक्रीये सहभाग घेण्याची चांगली संधी मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी निवडणुक अधिकारी, दोन्ही नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी निवडणुकीसाठी केलेल्या तयारीची माहिती दिली.

---

No comments:

Post a Comment