Thursday 7 December 2017

शेतमाल निर्यात सुविधा केंद्र

प्रक्रिया उद्योग आणि शेतमाल निर्यातीचे ‘नाशिक मॉडेल’ विकसीत करा
                                                   -सुभाष देशमुख


नाशिक, दि.7 : वाढत्या शेतमाल उत्पादनासोबतच नाशवंत मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारुन तसेच बाजारपेठेचा अभ्यास करीत शेतमाल निर्यातीला चालना देणारे ‘नाशिक मॉडेल’ प्रयत्नपूर्वक विकसीत करावे, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळातर्फे कळवण तालुक्यातील भेंडी येथे उभारण्यात आलेल्या शेतमाल निर्यात सुविधा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ.राहुल आहेर, प्रवीण दरेकर, जे.टी.गावीत, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक केदा आहेर, नगराध्यक्षा सुनिता पगार, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार,  सरव्यवस्थापक दिपक शिंदे, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष सुधाकर पगार, निर्यातदार संस्थेचे प्रशांत नारकर आदी उपस्थित होते.  

श्री. देशमुख म्हणाले, शेतमाल साठवणूक करुन बाजारपेठेत दर वाढल्यावर विक्री केल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. त्यासाठी कोल्ड स्टोरेज शृंखला वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीदेखील कांदा चाळी उभारुन कांद्याची साठवणूक करावी. त्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. विविध सुविधांनीयुक्त शेतकरी निर्यात सुविधा केंद्र शेतकऱ्यांना निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी उभारले आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांनी अशा सुविधांचा उपयोग करुन राज्याबाहेर शेतमाल पाठविण्याचा प्रयत्न करावा. तसेच व्यापारी वर्गाने कांदा टिकविण्यासाठी पर्याय शोधण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले, शेतकऱ्याला अधिक लाभ मिळावा यासाठी पणन मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. निर्यात वाढविण्यासाठी विविध उपाय करण्यात येत आहेत.  वेगवेगळ्या राज्यातील बाजारपेठांचा अभ्यास करुन रेल्वेद्वारे शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्याबाबतही माहिती संकलन करण्यात येत आहे. निर्यातकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
 शासन कार्पोरेट कंपन्यासोबत करार करणार असून त्या माध्यमातून शेतमाल उत्पादकांना सरळ ग्राहकांशी जोडण्याचा प्रयत्न आहे. शेतकरी आणि कंपन्यांच्या परस्पर सहकार्याने शेतकऱ्यांना लाभ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार दरेकर यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात श्री.पवार म्हणाले, आठ एकर क्षेत्रात उभारण्यात आलेल्या अशा स्वरुपाचा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. प्रकल्पात एक्सप्रेस फिडर व कांदा ग्रेडींगची सुविधा आहे. नवीन बाजारपेठ शोधून शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शेतकरी संघाचे पदाधिकारी, सदस्य, शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यात कांदा, डाळिंब व द्राक्षे या शेतमालाच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचा विचार करुन भेंडी ता.कळवण येथे कृषि पणन मंडळाने डाळींब, द्राक्षे व कांदा निर्यात सुविधा केंद्र उभारले आहे. या सुविधा केंद्रासाठी शेतकरी सहकारी संघ मर्या.कळवण यांनी 1.75 हेक्टर जागा उपलब्ध करुन दिली आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजना व नाशिक पॅकेज अनुदान रुपये 7.12 कोटी  आणि पणन मंडळ स्वनिधी रुपये 5.69 कोटी रुपये अशी  प्रकल्पाची एकूण किंमत 12.81 कोटी इतकी आहे.

  प्रकल्पांतर्गत 5 मे.टन प्रति 6 तास प्रि-कुलिंग सुविधा, 50 मे.टन कोल्ड स्टोरेज, 4350 चौरस फुटाचे दोन  पॅक हाऊस, 400 मे.टन (50 मे.टन क्षमतेच्या 8 चाळी) कांदा साठवणूक, प्लँट रुम, अँटी रुम, डिस्पॅच प्लॅटफार्म, व रिसिव्हिंग प्लॅटफॉर्म डि.जी. सेट 160 व 30 के.व्ही.ए. ट्रान्सफार्मर, अंतर्गत रस्ते आदी घटक आहेत.
या सुविधेमुळे या भागातील शेतमालाच्या निर्यातीच्या संधी उपलब्ध होऊन त्याद्वारे परकीय चलन, रोजगार निर्मीतीच्या संधी निर्माण होऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यास व त्याद्वारे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

----

No comments:

Post a Comment