Wednesday 13 December 2017

कर्जमाफीने सुमनबाईंना दिलासा

कर्जमाफीने महिला शेतकरी सुमनबाईंना मिळाला दिलासा

          नाशिक दि.13- ‘कर्जमाफी झाल्याचं ऐकलं आणि मनावरचं मोठं ओझ कमी झालं’  दिंडोरी तालुक्यातील महिला शेतकरी सुमनबाई जाधव यांची ही उत्स्फुर्त प्रतिक्रीया…. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत त्यांचे 80 हजाराचे कर्ज माफ झाले आहे.  निसर्गाच्या लहरीपणामुळे आलेल्या संकटातून सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे आम्ही तारले गेलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
 नवऱ्याच्या अचानक निधनामुळे घराची सर्व जबाबदारी स्वत:वर आलेली, तीन लहान मुलांची जबाबदारी पार पाडण्यासाठी सुमनबाईंना केवळ शेतीचाच आधार होता. शेतीसाठी 50 हजाराचं कर्ज काढलं, पण कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेसं उत्पन्न मिळत नव्हते. अशा परिस्थितीत शेती करण्याचा उत्साह कमी झाला असताना कर्जमाफीमुळे त्यांना नवी उमेद मिळाली.

          नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सुमनबाई जाधव यांचे लहान शेतकरी कुटुंब आहे. 2007 साली त्यांच्या पतीचं निधन झाल्यामुळे तिन्ही मुलांची जबाबदारी सुमनबाईवरच आली. भाजीपाल्याची शेती करायची आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर संसाराचा गाडा चालवायचा अशा बिकट परिस्थितीत सुमनाबाईंनी तिन्ही मुलांना आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण दिले. दोन्ही मुलींच्या लग्नासाठी नातेवाईकांकडून उसने पैसे घेतल्याने ते पैसे फेडण्याची जबाबदारीही सुमनबाईवर होती. अशा बिकट परिस्थितीत शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा परतफेड करण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता.
          फक्त दोन एकरातील भाजीपाला शेतीच्या उत्पन्नावर भागत नसल्याने त्यांनी दिंडोरी विविध कार्यकारी सोसायटीमधून यासाठी 2012 साली 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले. परंतू पावसाची अनियमितता आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतीतून पाहिजे तसे उत्पन्न मिळत नव्हते. कधी उत्पन्न मिळालच तर त्याला बाजारभाव मिळत नव्हता. त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे खुप अवघड झाल होत. परंतू सरकारने जाहीर केलेल्या या कर्जमाफीमुळे व्याजासह 80 हजार रुपयांचे कर्ज माफ झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्जमाफीमुळे माझ्यावरील मानसिक तसेच आर्थिक बोजा कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा नवउमेदीने व मुलाच्या साथीने शेतीच्या कामांना सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.

---

No comments:

Post a Comment