Tuesday 12 December 2017

शेतकरी कर्जमाफी

जिल्ह्यात आतापर्यंत 84 हजार 374 शेतकऱ्यांना
374 कोटी 32 लाख कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ

          नाशिक 12 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील पात्र 84 हजार 374 शेतकऱ्यांना 374 कोटी 32 लाख कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यात 56 हजार 296 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफी तर 28 हजार 078 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. शेवटच्या पात्र शेतकऱ्यास योजनेचा लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची  प्रक्रीया सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था निळकंठ करे यांनी दिली .   
          जिल्ह्यात काही भागात अवेळी  गारपीट, पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे  नुकसान झाले होते. त्यामुळे बरेच शेतकरी पीक कर्जाची परतफेड करु शकले नाहीत. परिणामी हे शेतकरी थकबाकीदार राहिल्यामुळे असे शेतकरी बॅंकेकडून नव्याने पीक कर्ज  घेण्यास पात्र होवू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अशा थकीत शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचे जाहीर केले होते.
योजनेअंतर्गत 30 जून 2016 अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहिर करण्यात आली होती. तसेच  कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
          तसेच 2015-2016, 2016-2017 वर्षात ज्या शेतकऱ्यांनी  कर्जाची  नियमितपणे परतफेड केली. अशा शेतकऱ्यांना 25 टक्के किंवा 25 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते.  जिल्ह्यातील एक लाख 68 हजार 835 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून त्यापैकी एक लाख 30 हजार 993 प्रत्यक्ष कर्जमाफी आणि 37 हजार 842 प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदान मिळणारे शेतकरी आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत एक लाख अडोतीस हजार सभासद शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 78 हजार 754  पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आजपर्यंत 333 कोटी 24 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल यांनी दिली.
शासन नियमानुसार कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या 51 हजार 817  लाभार्थ्यांच्या बँक कर्जखात्यात 284 कोटी 49 लाख रुपये त्यांच्या जमा करण्यात आले आहेत. यामध्ये पुनर्गठन झालेल्या शेतकरी सभासदांनादेखिल लाभ मिळाला आहे. जिल्हा बँकेच्या ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमित परतफेड केली आहे अशा सभासदांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला आहे. जिल्हा बँकेच्या 26 हजार 937 लाभार्थी सभासदांच्या खात्यात प्रोत्साहनपर 48 कोटी 75 लाख रुपये जमा करण्यात आले आहे.
          छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण 41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी  19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 77 लाख अर्ज प्राप्त झाले असून  छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास 41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील  एकवेळ समझोता योजनेअंतर्गत (ओटीएस) लाभ 26 हजार 728 पात्र शेतकऱ्यांना आपल्या हिश्श्याच्या रकमेचा भरणा करुन लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.
जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली जाणार आहे.
---


No comments:

Post a Comment