Thursday 14 December 2017

गिरणा प्रकल्प सिंचन

       गिरणा प्रकल्पांतर्गत सिंचनासाठी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नाशिक दि.14 :-  गिरणा प्रकल्पांतर्गत असलेल्या पांझण डावा कालवा,  जामदा डावा  कालवा, जामदा उजवा कालवा, निम्न गिरणा कालव्याद्वारे कालप्रवाही, कालवा उपसा जलाशय उपसा लाभक्षेत्रातील अधिसुचित नदी, नाले, ओढे यावरून पाण्याचा लाभ  घेणाऱ्या लाभधारकांसाठी पाणी मागणी अर्ज  सादर करण्याची मुदत 20 डिसेंबर 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
          यावर्षी प्रकल्पांतर्गत सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध झाला असून त्यापैकी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरीत उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगामात 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत उभी पिके तसेच विहिरीवरून व अन्य मार्गाने पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था असेल अशा लाभधारकांच्या गहु, हरबरा, ज्वारी, हा.दुरी, दादर, मका, कडवळ, कपाशी, सुर्यफुल, करडई, भाजीपाला आदी हंगामी पिकांना सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी  30 नोव्हेंबरपर्यंत पाणी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र पुरेसे मागणी क्षेत्र प्राप्त न झाल्याने पाणी मागणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
सिंचनाच्या पाणीपुरवठ्यासाठी 2016-17 पर्यंतची संपूर्ण पाणीपट्टी थकबाकी भरणा केलेली असावी. भरणा उडाफ्याचा व पाटमोट संबध नसावा.  प्रत्येक चारीच्या मुखाजवळच्या सलग क्षेत्रास मंजुरी देण्यात येईल. उडाफ्याचे व चारीच्या अथवा कालव्याच्या पुच्छ भागातील क्षेत्रास मंजुरी देण्यात येणार नाही. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये.
          शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. पाणी अर्जाचा निर्णय संबंधीत पाटशाखेत किंवा ग्रामपंचायतीत नोटीस बोर्डावर लावण्यात येईल. मंजूर क्षेत्रावर मंजूर पिकासच पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देताना सातबारा उतारा अथवा खाते पुस्तिका पाटशाखेत दाखवावी लागेल. अटींच्या पुर्ततेसह नमुना नं 7, 7 अ आणि 7ब पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत 20 डिसेंबर 2017  नंतर वाढविली जाणार नाही.
          पिण्याचे पाण्याचे आरक्षण किंवा काही अपरिहार्य कारणास्तव मंजुर पिकास पाणीपुरवठा न करता आल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यास पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही. मंजूरी पाटबंधारे अधिनियमानुसार राहणार असून पाण्याचा काटकसरीने वापर करून अधिकाधीक लाभधारकांनी पाण्याचा  लाभ घ्यावा,  असे गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जे.माने यांनी कळविले आहे.
         

                                                ***

No comments:

Post a Comment