Thursday 14 December 2017

जिल्हा क्रीडा पुरस्कार

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 26 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत

          नाशिक 14 : जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा कार्यकर्ता यांच्या साठी सन 2017-18 या वर्षाच्या पुरस्कारासाठी 26 डिसेंबर, 2017 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक यांनी केले आहे. 
          जिल्ह्यातील क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा कार्यकर्ता कार्याचे आणि योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता प्रत्येकी एक पुरस्कार तर  गुणवंत खेळाडुंसाठी तीन पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये एक महिला, एक पुरुष व एक दिव्यांग खेळाडुंचा समावेश असतो.  प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रुपये दहा हजार रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
          पुरस्कारांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असले पाहिजे. गुणांकनाकरिता त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल.
जिल्ह्यामध्ये क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले पाहिजे व त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.  क्रीडा संघटक कार्यकर्त्याने सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहिजे व त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व 5 वर्षापैकी 2 वर्षे त्या जिल्हयाचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले असले पाहिजे.

---

No comments:

Post a Comment