Tuesday 26 December 2017

‘शेल्टर-2017’

शेल्टर’च्या माध्यमातून नाशिकचा ब्रॅण्ड तयार करा
समृद्धी महामार्गास  नाशिकसाठी ‘डेडीकेटेड कनेक्टर’- मुख्यमंत्री

नाशिक दि.26 :- शहराला नवा आकार देण्याचे काम बांधकाम व्यावसायकिच करू शकतात.  शेल्टर प्रदर्शानच्या माध्यमातून नाशिकचा  ब्रॅण्ड  विकसीत  करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. नाशिकच्या विकासाच्यादृष्टीने समृद्धी महामार्गास नाशिकसाठी ‘डेडीकेटर कनेक्टर’ देण्याचा निश्चित विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
क्रेडाई नाशिकच्यावतीने डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित शेल्टर-2017’ प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष महाजन, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, डॉ.राहुल आहेर, महापौर रंजना भानसी, शेल्टर समितीचे अध्यक्ष सुनिल कोतवाल, समन्वयक उदय घुगे  आदी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री म्हणाले, कोणतेही शहर हे त्या शहरातील आपुलकीने वागणाऱ्या नागरिकांमुळेच मोठे होते. क्रेडाईने हे आपुलकीचं नाते जपले असून आपल्या सर्वांच्या माध्यमातून नाशिकला स्मार्ट सिटी बनवायचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे 2022 अंतर्गत सर्व सामान्य नागरिकांना परवडणारी घरे बांधण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वाधिक गुंतवणूक ही बांधकाम व्यवसायात होणार आहे. शहरी भागात 10 लाख व ग्रामीण भागात साडेबारा लाख घरे बांधावयाची असल्याने क्रेडाइेने हे शिवधनुष्य पेलण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापुर महानगरपालिका 30 हजार घरे तर नागपुर महानगरपालिका 10 हजार घरे बांधत आहे. नाशिक शहरातही याप्रकारची घरे बांधण्यासाठी सहभाग घेऊन महापालिकेमार्फत अशी घरे बांधण्याचा प्रस्ताव दिल्यास त्यास केंद्र व राज्य शासनामार्फत तात्काळ मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
 महाराष्ट्राला देशाच्या वीस वर्ष पुढे घेऊन जाण्याची शक्ती असलेला समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जात आहे. या महामार्गाला ‘डेडीकेटेड कनेक्टर’च्या माध्यमातून ईगतपुरी ते नाशिक जोडण्यासाठी निश्चीतपणे प्रयत्न केला जाईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, नाशिक शहर हे ऐतिहासिक व पौराणिकदृष्टया महत्वपूर्ण शहर आहे. येथील वातावरण चांगले आहे. या शहराच्या सुरक्षिततेसाठी शहरात सिसिटीव्हीचे नेटवर्क उभारण्यात येणार असून शहरातील प्रमुख ठिकाणी वायफाय सेवाही सुरु करण्यात येणार आहे. नाशिक शहर दत्तक घेतलेले असल्याने या शहराच्या विकासासाठी शासनासमोर येणाऱ्या प्रस्तावांना सकारात्मक दृष्टीकोनातून मान्यता देण्यात येईल.

शहरातील परिवहनसेवा चांगली असेल तर शहर सुधारते हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून शहरातील एस.टी.महामंडळ चालवित असलेली परिवहन सेवा महापालिकेने चालवावी यासाठी शासन मनपाला सर्वतोपरी मदत  करण्यात येईल. शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्यासंदर्भात असलेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक लवकरच मुंबई येथे घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
 क्रेडाईच्या वतीने अध्यक्ष सुनिल कोतवाल व समन्वयक उदय घुगे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्मृतीचिन्ह देवुन स्वागत केले. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष सुनिल कोतवाल यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनाबाबत माहिती दिली. शेल्टरचे समन्वयक श्री. घुगे यांनीदेखील विचार व्यक्त केले.
 या कार्यक्रमास शहरातील उद्योजक, बांधकाम व्यावसायिक , बँकर्स, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---         
         




No comments:

Post a Comment