Thursday 14 December 2017

कर्जमाफीमुळे नवी उमेद

कर्जमाफीमुळे काशिनाथ बेरड यांना शेती करण्याची नवी उमेद

          नाशिक दि.14- नाशिक तालुक्यात पाथर्डी येथील अल्पभूधारक शेतकरी असलेल्या काशिनाथ बेरड यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे शेती करण्यासाठी नवी उमेद मिळाली आहे. त्यांचे एक लाख 49 हजाराचे कर्ज माफ झाले आहे.
          श्री.बेरड  आपल्या दोन एकर क्षेत्रात मका, सोयाबिन, टोमॅटो अशी पीक ते घेत असत. शेतीसाठी त्यांनी 2013 मध्ये सोसायटीकडून कर्ज घेतले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती उत्पादनावर सातत्याने परिणाम झाल्याने फारसे उत्पन्नही या काळात त्यांना मिळाले नाही. घरखर्चाची समस्या असताना मुलीच्या लग्नामुळे कर्जाचे हप्ते थकले. उत्पन्न वाढविण्यासाठी द्राक्ष बाग लावली असता अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाले. निसर्गाच्या या आघातामुळे कर्ज फेडणे त्यांना जड झाले.

          काशिनाथ पीक कर्जाची परतफेड करु शकले नाहीत. परिणामी थकबाकीदार राहिल्यामुळे असे शेतकरी बॅंकेकडून नव्याने पीक कर्ज  घेण्यास पात्र होवू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर डोक्यावर असलेले पीककर्ज आणि निसर्गाची अवकृपा अशा दुहेरी संकटात ते सापडले होते. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला.
          कर्जमाफीकडे डोळे लावून बसलेल्या श्री. बेरड यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे विभागीय अधिकारी बी.एस. बोरुडे, बँक निरीक्षक सुनिल पाटील आणि पाथर्डी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेचे सचिव हेमंत भरवीरकर यांनी त्यांचे  1 लाख 49 हजार रुपये पीककर्ज माफ झाल्याची रक्कम भरणा पावती दिली तेव्हा त्यांचे डोळे भरुन आल्याचे श्री.बेरड सांगतात.

           शेतीशिवाय उत्पन्नाचे दूसर कोणतच साधन नाही. कर्ज थकल्याने नव्याने पीककर्ज मिळण बंद झाल्याने अडचणी वाढत चालल्या होत्या. बियाणे, खते  घरखर्चासाठी उत्पन्न येण गरजेचे आहे. कर्जमाफीमुळे माझा भार हलका झालाय. आता मी पुन्हा उभा राहून कुटुंबाची जबाबदारी पेलू शकेल, ही त्यांची प्रतिक्रीया कर्जमाफी योजनेचे  शेतकऱ्यांसाठी असलेले महत्व सांगणारी आहे.
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ तत्परतेने शेतकऱ्यांपर्यत पोहोचवण्याचे काम पाथर्डी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेने  केले. संस्थेच्या 719 सभासद खातेदार शेतकऱ्यांपैकी 324 कृषी कर्ज उचल करणारे शेतकरी आहेत. संस्थेच्या सर्व पात्र कर्जदारांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.


हेमंत भरवीरकर - शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या लाभाची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाथर्डी शाखेतून एसएमएसद्वारे दिली जाते आहे. तसेच संस्थेच्या कार्यालयातदेखील त्यांना कर्जमाफी रक्कम, प्रोत्साहन लाभाची माहिती दिली जात आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीत त्यांना कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे.



0000

No comments:

Post a Comment