Tuesday 26 December 2017

मंदिर जिर्णोद्धार

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकासासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य -मुख्यमंत्री

नाशिक दि.26 :-  श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला देशभरातून येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यशासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल आणि लवकरच त्या संदर्भातील बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या जिर्णोद्धाराचे भूमीपूजन आणि भक्तनिवासाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष महाजनग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, खासदार हेमंत गोडसे,  हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, निर्मला गावीत, दिपिका चव्हाण, डॉ.राहुल आहेर, सीमा हिरे, आशिष शेलार, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर,  आदी उपस्थित होते.

           संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन करणे हा भाग्याचा क्षण असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले,  संत निवृत्तीनाथ महाराजांचे मंदीर उभे करणे हे ईश्वरीय कार्य आहे. या कार्यात नागरिकांच्या सहभागाबरोबरच शासनाच्यावतीने आवश्यक सहकार्य करण्यात येईल. नेत्रदिपक असा कुंभमेळा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाल्याने एमआयटी सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवस्थापनाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने राज्याचा विशेष गौरव केला. नागरिकांचे सहकार्य या सोहळ्यासाठी महत्वाचे ठरले.

          त्र्यंबकेश्वर हे धर्म आणि संस्कृतीचे पीठ असल्याने येथे सुविधा निर्माण करण्याबाबत राज्यशासन गंभीर आहे. नागरिकांच्या सहकार्याने या पावन नगरीचा विकास करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

          वारकरी संप्रदायाने परकीय आक्रमणाच्या काळात भागवत धर्म जिवंत ठेवला. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह वारकरी संप्रदायातील संतांनी सद्विचारांचा वारसा महाराष्ट्राला दिला आहे. त्यामुळे निवृत्तीनाथ मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या माध्यमातून विचारांचा हा वारसा पुढे नेण्यासाठी शासनाचे सहकार्य राहील, असेही  मुख्यमंत्री म्हणाले.


          पालकमंत्री महाजन म्हणाले, कुंभमेळा, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदीर आणि बारा ज्योर्तिलिंगापैकी एक श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर यामुळे त्र्यंबकेश्वरचे नांव राष्ट्रीयस्तरावर पोहोचले आहे. देशभरातून भाविक या ठिकाणी येतात. या पवित्रनगरीचे पर्यटनस्थळात रुपांतर करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. येथे पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा विशेष भर आहे. युनोस्कोने कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय वारसा घोषित केल्याने त्र्यंबकेश्वरचे नांव जगभरात पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, असे श्री. महाजन म्हणाले.
             याप्रसंगी शाम जाजु, मारुती महाराज कुऱ्हेकर यांनी विचार व्यक्त केले. संस्थानचे  अध्यक्ष संजयनाना धोंडगे यांनी प्रास्ताविकात भक्तनिवास आणि संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदीर जिर्णोद्धाराविषयी माहिती दिली.

          मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर जिर्णोद्धाराचे भूमिपूजन आणि नव्याने उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाचे लोकार्पण करण्यात आले.
          कार्यक्रमाला सांदिपन महाराज शिंदे, पांडुरंग महाराज धुवे, माधवमहाराज धुवे,  सागरानंद सरस्वती महाराज, संस्थानचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस यांचे ओझर येथे स्वागत
            तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे आज ओझर विमानतळ येथे   आगमन झाले.  प्रशासनाच्यावतीने  विभागीय आयुक्त महेश झगडे  यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे,  देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल, महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना  आदी उपस्थित होते. 


00000

No comments:

Post a Comment