Saturday 9 December 2017

सार्वजनिक खाजगी भागीदारी परिषद-2017

संरक्षण सामुग्री उत्पादनात खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने विकास
-डॉ.सुभाष भामरे

            नाशिक दि.9:- संरक्षण सामुग्री उत्पादन व संशोधनामध्ये खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने विकासाचे सरकारचे धोरण असून यासाठी खाजगी उद्योजकांनी सहभागासाठी पुढे येण्याचे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले.

          हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमीटेड (एचएएल) ओझर येथे आयोजितसार्वजनिक खाजगी भागीदारी परिषद-2017’ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास एचएएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक टी.सुवर्णा राजू,  मिग कॉम्पेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजित सिंग, एचएएलचे एस. निर्मल थसय्या, श्री जयपाल , डायनामाइट टेक्नॉलॉजीचे उदय मल्होत्रा आदी उपस्थित होते.

डॉ.भामरे म्हणाले, देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी खाजगी उद्योगांचा सहभाग महत्वाचा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सार्वजनिक खाजगी भागीदारीसाठी उद्योगांच्या सहभागाचे रोल मॉडेलसर्वांसमोर आले असून ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. खाजगी उद्योगांचा संरक्षण  उत्पादन क्षेत्रातील सहभाग हा महत्वाचा व देशासाठी व्यूहात्मक धोरणाचा भाग आहे.  

ते म्हणाले, एचएएल हे भारतीय वायुदलाचा  कणा आहे. त्यामुळे हवाई संरक्षणाच्या स्वयंपूर्णतेचा एचएएल मानबिंदू ठरले आहे. ओझर प्रकल्पात लढावू विमानांच्या पाचव्या जनरेशनचे उत्पादन केले जाईल. त्यामुळे भविष्यातदेखील विमान उत्पादनात ओझरचे महत्वाचे स्थान राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री. राजू म्हणाले, हवाई दलातील 80 टक्के विमाने ही एचएएलच्या माध्यमातून गेली आहेत. विमानांबरोबरच हेलिकॉप्टर उत्पादनासाठीदेखील एचएएल महत्वपर्ण भूमिका बजावत आहे. खाजगी उद्योगांसाठी संरक्षण क्षेत्रात सहकार्यासाठी अनेक संधी आहेत, असे ते म्हणाले.

 यावेळी श्री. दलपती सिंग, श्री. मल्होत्रा आदींनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमास खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम, सीमा हिरे, संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी, एचएएलचे अधिकारी आदी उपस्थित होते.
 याप्रसंगी  संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी श्री. मल्होत्रा यांना  ‘सुखोई 30 एमकेआयया लढावू विमानांच्या बांधणीकरीता 100 व्या असेंब्ली पार्ट संचाचेस्वीकृती प्रमाणपत्रप्रदान केले.

                                                                        *********

No comments:

Post a Comment