Friday 8 December 2017

जैव- वैद्यकीय कचरा व्यवस्थापन

जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी जनजागृती महत्वाची- सतीश गवई


          नाशिक, दि. 8 : प्लास्टीक कचऱ्याप्रमाणेच जैव- वैद्यकीय कचऱ्याचा विपरीत परिणाम  पर्यावरणावर व मानवाच्या आरोग्यावर होत आहे. त्याअनुषंगाने जैव-वैद्यकीय कचऱ्याचे पर्यावरणदृष्टया सुयोग्य व्यवस्थापन  करण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पर्यावरण विभागाचे अति.मुख्य सचिव सतीश गवई यांनी केले.
          महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रणमंडळ, ग्लोबल इन्व्हारमेंट फॅसिलीटी युनिडो, केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल एक्सप्रेस इन, नाशिक येथे आयोजित जैव- वैद्यकीय कचरा व्यवस्थापन पथदर्शी उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाचे संचालक मनोज गांगेय, युनिडोचे प्रादेशिक समन्वयक डॉ.शक्ती धुआ, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रधान वैज्ञानिक अधिकारी डॉ. अमर सुपाते, युनिडो मुख्यालय विएन्ना प्रकल्प व्यवस्थापक एर्लिंन्डा गॅलवन, भारताचे युनिडो प्रतिनिधी रेणे व्हॅन बेरकेल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते.

          श्री.गवई म्हणाले, जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन पथदर्शी प्रकल्पांतर्गत देशातील महाराष्ट्र, गुजरात,पंजाब, कर्नाटक, ओडिसा या पाच राज्यांचा समावेश करण्यात आला असून महाराष्ट्रातील नाशिक हा पथदर्शी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, चांदवड, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी ग्रामीण रुग्णालय, प्रयाग हॉस्पिटल, मानवता कॅन्सर सेंटर आदी रुग्णालयांची या पथदर्शी कार्यक्रमात निवड करण्यात आली आहे.
          जैव-वैद्यक कचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार सर्व दवाखाने रुग्णालये प्रयोगशाळा, यांच्या माध्यमातून निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात पिवळा, लाल, निळा व पांढरा अशा चार रंगाच्या प्रवर्गामध्ये वर्गीकरण्यात येणार आहे. व त्यानुसार त्याचे निर्मूलन करण्याची प्रक्रियादेखिल करण्यात येणार आहे असेही श्री.गवई यांनी सांगितले.

          श्रीमती भानसी म्हणाल्या, नाशिक जिल्ह्यातील या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये जैव-वैद्यकीय कचरा निर्मुलनासंदर्भात प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करुन त्याबाबत अंमलबजावणी करण्यावर रुग्णालयीन व्यवस्थापनाने भर द्यावा.
          आमदार फरांदे यांनी  जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन करणे हे नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे आहे, असे सांगितले. जैव वैद्यक कचऱ्याचे सुयोग्य पद्धतीने निर्मुलन केल्यास साथीच्या रोगांवर नियंत्रण करता येईल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग राहील व सहकार्य राहील, असेही त्या म्हणाल्या.

          पर्यावरण संतुलनासाठी जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापना बाबत वैद्यकीय  महाविद्यालये, रुग्णालये येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना जैव वैद्यक कचरा विल्हेवाट लावण्याबाबतचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे मत आमदार हिरे यांनी व्यक्त केले.
          यावेळी जैव-वैद्यक कचरा संकलित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपचा शुभारंभ तसेच जैव-वैधक कचरा संकलित करणाऱ्या वाहनांचे जीपीएसद्वारे मार्ग पाहणी करणाऱ्या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आर.यु.पाटील यांनी केले.

----

No comments:

Post a Comment