Wednesday 27 December 2017

कौशल्य विकास

     कौशल्य विकासामुळे युवकांना रोजगाराच्या संधी - सुभाष देसाई


       नाशिक, दि. 27:- साधन संपन्नता, पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळामुळे उद्योगांसाठी पोषक वातारण असून भविष्यात शैक्षणिक पात्रतेसोबतच कौशल्य असलेल्या युवकांना व्यवसाय व नोकरीसाठी अनेक संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
          बेजॉन देसाई फाऊंडेशन पुरस्कृत कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमाताई हिरे, प्रा.देवयानी फरांदे, वनाधिपती विनायकराव पाटील, मानवधन शिक्षण संस्थेचे प्रकाश कोल्हे, बेजॉन देसाई फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज टिबरेवाला, युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

          श्री. देसाई म्हणाले, रोजगार निर्मितीच्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारने कौशल्य विकासावर भर देण्याचे धोरण स्विकारले असून राज्यामध्ये यासाठी महाराष्ट्र कौशल्य विकास महामंडळ तयार  करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र खाते निर्माण करण्यात आले आहे. महाविद्यालयातून मोठ्या संख्येने बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची संख्या लक्षात घेता त्यांना कौशल्य संपन्न करण्याची गरज आहे.

          कौशल्य विकासाच्यादृष्टीने पावले उचलतांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या आधुनिकीकरणासाठी उपाय करण्यात येत आहे. राज्यात 900 कौशल्य विकास संस्था असून त्यांच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. मोठे उद्योग या संस्थांना दत्तक घेत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
          अमरावती येथे वस्त्रोद्योग क्लस्टरमधील सियाराम, रेमण्ड आदी मोठ्या कापड उद्योगासाठी लागणारे कुशल कामगार तयार करण्यासाठी देशपातळीवरील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईनची तेथे सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे तेथील मुली , महिला व युवकांना  प्रशिक्षण आणि रोजगाराची मोठी संधी मिळणार आहे, असे श्री. देसाई म्हणाले.
          याप्रसंगी आमदार श्रीमती हिरे , प्रा. फरांदे यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.  मंत्री महोदय व मान्यवरांनी कौशल्य विकास केंद्राची पाहणी केली.



                                                 उद्योग विकासाबाबत उद्योजकांसमवेत चर्चा
       उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी नाशिकमधील उद्योग विकास व उद्योजकांच्या विविध प्रश्नांबाबत  निवडक उद्योजकांसमवेत चर्चा केली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थपक पी.डी. रेंदाळकर, नासचे अध्यक्ष विक्रम सारडा, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, डॉ. उदय खरोटे , विनोद शहा, विक्रम मते आदी उपस्थित होते.
          याप्रसंगी कायमस्वरुपी उद्योग प्रदर्शन केंद्र (इंटरनॅशनल कनव्हेन्शन सेंटर ) उभारणे, लघुउद्योग घटकांसाठी औद्योगिक संकुल उभारणे व  महिला उद्योजकांसाठी उद्योग गाळे उपलब्ध करुन देणे आदीप्रश्नी उद्योग संघटना करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती  मंत्रीमहोदयांना देण्यात आली.  श्री. देसाई यांनी  यावेळी नाशिक येथील औद्योगिक विकासासाठी शासन कटीबद्ध असून विविध प्रश्नांबाबत उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा करुन तातडीने प्रश्न सोडविण्यात येतील, असे सांगितले.    
                                                              
00000

  

No comments:

Post a Comment