Monday 2 July 2018

फ्युनिक्युलर ट्रॉली उद्घाटन


जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सर्व सहकार्य-देवेंद्र फडणवीस

नाशिक दि.2: नाशिक जिल्हा धार्मिक पर्यटनासाठी  प्रसिद्ध असून जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी शासनाकडून सर्वप्रकारे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड येथे उभारण्यात आलेल्या फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री  गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार  हरिश्चंद्र चव्हाण, जि.प.अध्यक्षा शितल सांगळे, महापौर रंजना भानसी,  आमदार  छगन भुजबळ, देवयानी फरांदे, सीमा हिरे, जीवा पांडू गावीत, दिपीका चव्हाण, पंकज भुजबळ, राहुल आहेर, नरेंद्र दराडे, बाळासाहेब सानप, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुर्यकांत शिंदे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, विशेष पोलीस महानिरीक्षक चेरींग दोरजे, सप्तशृंगी निवासीनी देवी ट्रस्टच्या अध्यक्षा यु. एन. नंदेश्वर आदी  उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, देशात आर्थिक पर्यटनाला अधिक महत्व आहे त्यामुळे तीर्थस्थळांचा विचार करतांना  भाविकांना चांगल्या सुविधा  पुरविल्या तर तेवढीच चांगली अर्थव्यवस्था उभी रहाते. फ्युनिक्युलर ट्रॉलीची सुविधा उपलब्ध झाल्याने  गडाच्या परिसरातील अर्थकारणाला चालना मिळेल,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 मुख्यमंत्री म्हणाले, देवीच्या शक्तीपीठाकडे जाण्यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशातील पहिला प्रयोग या ठिकाणी करण्यात आला आहे. इथल्या सुविधा जागतिक दर्जाच्या असून जेष्ठ नागरिक  आणि दिव्यांग भाविकांना आईचे दर्शन  सहजपणे घेता येईल. गडावरील पर्यटनाला यामुळे चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

श्री. महाजन म्हणाले,त्र्यंबकेश्वर , सप्तशृंग गड, नाशिक आणि शिर्डी येथील पर्यटनाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्र्यंबकेश्वर येथे  शासनाच्या ‘प्रसाद’ योजनेतून पायाभूत सुविधांचा विकास करणयाबरोबरच  रोप-वेची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून  स्थानिकांना रोजगार मिळावा  असा शासनाचा प्रयत्न आहे. फ्युनिक्युलर ट्रॉलीमुळे  भाविकांना देवीचे दर्शन  घेणे आधिक सुलभ होईल. गडावर डोलीचा व्यवसाय करणाऱ्यांना रोजगार मिळावा यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.


श्री. भुसे म्हणाले, सप्तशृंगी गडाचा ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळामध्ये समावेश करण्यात आला असून  गडावरील विकासाला चालना देण्यासाठी  25 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गड परिसरात पर्यटन विकासाच्या दृष्टीने कामे करण्यात येतील.
यावेळी आमदार छगन  भुजबळ यांनी  मनोगत व्यक्त केले. मुख्य अभियंता हेमंत पगारे यांनी फ्युनिक्युलर ट्रॉली प्रकल्पाची माहिती  दिली. कार्यक्रमाला सरपंच सुमनबाई सुर्यवंशी, मुख्य वनसंरक्षक रामाराव, अधीक्षक अभियंता रणजीत हांडे, कार्यकारी अभियंता किशोर केदार, बी. पी. वाघ, राजकुमार गुरूबक्षाणी, सोमनाथ लातुरे आदी  उपस्थित होते.

              पाझर तलाव नुतनीकरणाच्या कामाचे लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्पुर्वी गडावरील भवानी पाझर तलाव नुतनीकरण कामाचे लोकार्पण केले. त्यांनी कामाची पहाणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तलावाच्या माती धरणाची लांबी 180 मी. असून धरणाची साठवण क्षमता 6.68 द.ल.घ.फूट आहे. चणकापूर धरण येथून 25 कि.मी.ची थेट पाईपलाईन करण्यात आली आहे. या तलावाच्या नुतनीकरणामुळे भाविकांसाठी पाण्याची चांगली सुविधा होणार आहे.
          मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्लास्टीक बाटल्यांवर प्रक्रिया करण्याच्या यंत्राचे उद्घाटनदेखील मुख्य कार्यक्रमानंतर करण्यात आले.


वृत्त क्र :-                                                                                      
पोलीस वहनावरील जी.पी.एस प्रणालीचे उद्घाटन




नाशिक दि.2: जिल्हा नियोजन  व विकास समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे जी.पी.एस प्रणालीने सुसज्ज गस्ती पथकाचे वाहन व फिरते पोलीस  ठाणे उपक्रमाचा शुभारंभ ओझर विमानतळ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाला यावेळी पालकमंत्री  गिरीष महाजन,  खासदार  हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी,  आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप, जि.प. अध्यक्षा शितल सांगळे, विभागीय आयुक्त राजाराम माने, विशेष पोलीस महानिरीक्षक चेरींग दोरजे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.

नागरिकांच्या विविध तक्रारीसंदर्भात सुरक्षिततेची हमी वाढविण्यासाठी कार्यक्षम पोलीसिंग करणे व जवळ असलेल्या पोलीस वाहनास नागरिकाच्या मदतीत त्वरीत पाठविण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. एकूण 92 वाहनांवर जीपीएस आधारीत प्रणाली बसविण्यात आली आहे. ही अत्याधुनिक प्रणाली अपघाताच्या वेळेस आणि गंभीर गुन्ह्याच्यावेळी जलदगतीने व अचुकतेने मदत पाठविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
जीपीएस प्रणालीसोबत फिरते पोलीस ठाणे ही महत्वपूर्ण योजना ग्रामीण पोलीस दलातर्फे कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 40 पोलीस ठाणे अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महिला अत्याचार, बँक व सोशल मिडियाद्वारे फसवणुकीचे प्रकार, चेन स्नॅचिंग आदी प्रकार टाळण्यासाठी फिरते पोलीस ठाणे उपयुक्त ठरणार आहे.
----
राईनपाडा घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत

नाशिक दि.2: धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील घटनेत मृत  व्यक्तिंच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले. मृत व्यक्तिंच्या परिवाराला मदतीच्या माध्यमातून आधार देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राईनपाडा येथील घटना अत्यंत दु:खदायी आहे. संशयाच्या  बळावर पाच लोकांची निर्घुण हत्या होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि अतिशय निर्घुण प्रकारची घटना आहे. त्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. अटकेची कारवाईदेखील करण्यात येत आहे.  काही लोक जाणिवपूर्वक अफवा पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर लक्ष देण्याविषयी पोलिसांना लक्ष देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत कायदा हातात घेणे चुकीचे आहे. म्हणून यासंदर्भात कडक कारवाई करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा घटना पुन्हा होऊ नये असा प्रयत्न शासनातर्फे करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
-----

No comments:

Post a Comment