Friday 13 July 2018

‘कोटपा’ कायद्याबाबत जनजागृती


            ‘कोटपा’ कायद्याबाबत जनजागृतीवर भर द्या-डॉ.सुरेश जगदाळे


       नाशिक, 13 : तंबाखूच्या सेवनामुळे आरोग्यावर प्रतिकुल परिणाम होत असल्याने तंबाखूचे सेवन टाळणे व सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 मधील तरतूदींबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनजागृतीवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारी आदी उपस्थित होते.
डॉ.जगदाळे म्हणाले, राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना तंबाखू सेवन करणाऱ्यांचे समूपदेशन करण्यात यावे. तसेच कायद्यातील तरतूदींचे कठोरतेने पालन करण्यात यावे. यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात यावे. नर्सिंग कॉलेजच्या परिसरातील पानटपरी त्वरीत हटविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी तंबाखू नियंत्रण कायद्यातील तरतूदींची माहिती देण्यात आली. 
पीसीपीएनडीटी कायद्यासंदर्भात बैठक
      यावेळी पीसीपीएनडीटी कायद्याबाबत बैठकीचेदेखील आयोजन करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत 22 सोनोग्राफी केंद्रावर तुटींमुळे कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच न्यायालयात 18 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. होत असलेल्या कार्यवाहीमुळे गेल्या वर्षभरातील लिंग गुणोत्तरात लक्षणीय सुधारणा झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नागरिकांनी प्रसूतीपूर्व लिंगनिदान होत असल्याची माहिती 1800-233-4475 या टोल फ्री क्रमांकवार किंवा www.amchimulgi.gov.in  या संकेतस्थळावर दिल्यास शासनाच्या खबऱ्या योजनेअंतर्गत एक लाखापर्यंत पारितोषिक देण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
          तत्पूर्वी जिल्हा एड्स नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. गेल्या तीन महिन्यात अधिक जोखमीच्या ठिकाणी एकही एचआयव्ही बाधीत आढळला नाही. या ठिकाणी जनजागृतीचे चांगले कार्य सुरू असल्याचे सांगून डॉ.जगदाळे यांनी बाधीत रुग्णांबाबत सातत्याने सर्वेक्षणावर भर देऊन असे रुग्ण आढळणाऱ्या क्षेत्रात प्रबोधनाचे कार्यक्रम राबविण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या.
          बैठकीला जिल्ह्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment