Wednesday 25 July 2018

कुक्कट विकास गट


पाच तालुक्यात  सघन कुकुट विकास गटांची स्थापना

नाशिक दि.25- कुक्कट पालनास प्रोत्साहन देणे तसेच ही प्रक्रिया रोजगारक्षम करण्याच्यादृष्टीने सार्वजनिक-खाजगी भागीदार तत्वावर सघन कुकुट विकास गटांची स्थापना करणे ही योजना जिल्ह्यातील  देवळा, पेठ, सुरगाणा, ईगतपुरी व त्र्यंबकेश्वर या पाच तालुक्यातील परिसरात  2018-19 ते 2020-21 या तीन वर्षात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. 
मागास व दुर्गम तालुक्यांना प्रधान्य देण्यात येणार असून जिल्ह्यातील नाशिक तालुका वगळून इतर 14 तालुक्यातून योजना  राबविण्यात  येईल. योजना वैयक्तिक लाभाची असून योजनेचे आर्थिक स्वरुप  10 लाख 27 हजार 500 इतके आहे. सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 50 टक्के अनुदानावर योजना राबविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय निवड समितीच्या शिफारशीनुसार कॅरी मान्यताप्राप्त अधिकृत संस्थाकडून  एकदिवशीय मिश्र कुक्कुट पिल्ले, 20 आठवडे वयाचे अंड्यावरील पक्षी, उबवणूकीची पक्षी आदी लाभार्थ्याने खरेदी करणे बंधनकारक राहील. लाभ दिलेल्या लाभार्थ्यांनी प्रकल्प स्थापनेपासून  3 वर्ष कार्यान्वित ठेवणे बंधनकारक राहील .
निवडलेल्या लाभार्थ्यांना सघन कुक्कुट विकास प्रकल्प नाशिक यांचेमार्फत कुक्कुट पालन विषयक 5 दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणात अंड्यांवरील पक्षांचे विविध जाती, त्यांचे संगोपन, निवारा, खाद्य व पाणी देण्याच्या पद्धती, खाद्याचे प्रकार, विविध रोग प्रतिबंधक लसीकरण, उबवणुकीच्या अंड्यांपासून पक्षांची निर्मिती, अंडी, नर पक्षी, तलंगा, एक दिवसीय पक्ष्यांची विक्री व्यवस्था, उपलब्ध बाजार पेठ इ. विषयांवर निवड झालेल्या लाभार्थींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
 योजनेबाबत तपशील संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यांचेकडे उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच योजनेच्या अनुषंगाने आवश्यक मार्गदर्शक सूचना,योजनेचा उद्देश, योजनेचे कार्यक्षेत्र , अर्जाचा नमुना व इतर सर्व तपशील तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी यांचेकडे उपलब्ध आहे. तालुक्यातील लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नाशिक यांनी केले आहे.
------------


No comments:

Post a Comment