Saturday 14 July 2018

साथरोग नियंत्रण आढावा


राहुडे गावासाठी पर्यायी पाणीपुरवठा योजना-गिरीष महाजन

       नाशिक, 14 : राहुडे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर खोलगट भागात असल्याने पावसाळ्यात पाणी दुषित होऊन पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवू नये यासाठी दीड किलोमीटर अंतरावरील तलावाजवळ नवी विहीर तयार करण्यात येईल. त्यासाठीची योजना जिल्हा परिषदेने तात्काळ तयार करावी, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र, वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

          श्री.महाजन यांनी  सुरगाणा तालुक्यातील राहुडे गावाला भेट दिली. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जीवा पांडू गावीत, डॉ.राहूल आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे आदी उपस्थित होते.

राहुडे गावात अतिसाराची लागण झाल्याने चार नागरिकांचा मृत्यु झाला होता.या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री महाजन यांनी गावाला भेट दिली. त्यांनी पाण्याच्या स्त्रोताला भेट देऊन माहिती घेतली. मृत्यूमुखी पडलेल्या नामदेव गांगुर्डे आणि बशिऱ्या लिलके यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन श्री.महाजन यांनी त्यांचे सांत्वन केले.

गावातील शौचालयाचे बांधकाम, शौचालयाचा वापर, आरोग्यविषयक सुविधा आदींचा आढावा घेऊन तात्काळ त्याबाबतची माहिती सादरकरण्याच्या सुचना त्यांनी  दिल्या. ग्रामस्थांना आरोग्यविषयक दक्षतेबाबत माहिती देण्याबरोबर खबरदारीच्या उपाययोजनांकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. त्यांनी जिल्हा परिषद शाळेत जाऊन रुग्णांच्या प्रकृतीविषयी आणि तेथील सुविधेची माहिती घेतली. साथरोगाचा फैलाव अधिक होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्याबाबत त्यांनी सुचना दिल्या.

राहुडे येथील 22 रुग्णांना वणी येथील ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात संदर्भित करण्यात आले आहे. गावातील चार नागरिकांचा अतिसाराची लागण झाल्याने मृत्यु झाला आहे. हे चारही रुग्ण विविध विकाराने आजारी होते. विहीर स्वच्छ करण्यात आली असून गावात दवंडीद्वारे घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती देण्यात आली आहे. स्थानिक स्तरावर रुग्ण तपासणी कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. घरोघरी मेडिक्लोअरचे वाटप करण्यात आले आहे व पिण्याच्या पाण्याच्या ओटी टेस्ट करण्यात येत आहेत. विहीरीच्या पाण्याचे रोज सुपर क्लोरिनेशन करण्यात येत आहे. विहीरीजवळील चर बुजविण्यात आले आहे. या उपाययोजनांनंतर साथ नियंत्रणात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
पालकमंत्र्यांकडून साथरोग नियंत्रणाबाबत आढावा

पालकमंत्री श्री.महाजन यांनी तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथे बैठकीत साथरोग नियंत्रणाबाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. ग्रामीण भागात आवश्यक औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावा. पाण्याचे वेळोवेळी नमुने तपासण्यात यावे. तसेच पावसाळ्यात घ्यावयाच्या खबरदारीविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. अतिसाराची लागण झालेल्या परिसरात पाणी  पुरवठा करताना विशेष दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
राहुडे येथे दररोज पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. पाऊस आल्यावर परिसरातील पाण्याच्या स्त्रोतांबाबत विशेष लक्ष देण्यात येत आहे. ग्रामीण भागात जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. साथरोगाची लक्षणे दिसल्यास ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेला सुचीत करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी  दिली.
 साथरोग नियंत्रणाबाबत दक्षता घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गिते यांनी सांगितले.
बैठकीत खते आणि बियाणे पुरवठा, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत आढावा घेण्यात आला. नाशिक महानगरपालिकेशी संबंधित प्रश्नांबाबत  लवकरच आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ.राहुल आहेर, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे तसेच महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते एन.एम.आव्हाड यांना श्रद्धांजली

बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित शोकसभेत ज्येष्ठ नेते एन.एम.आव्हाड यांना श्रद्धांजली अर्पण केली. कै.आव्हाड यांचे कार्यकर्तुत्व मोठे असून नाशिक शहरासाठी महत्वाचे योगदान  आहे. त्यांच्या निधनाने शहर आणि जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
00000

No comments:

Post a Comment